MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे; विवेक भीमनवार रजेवर जाताच राज्यपालांचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (MPSC) अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर गेल्यानंतर त्यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार आयोगाचे सदस्य सतीश बबन वाघोले यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या वतीने यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आले आहेत. आयोगाच्या परीक्षेतील पेपरफुटी आणि कथित गैरप्रकारांविरोधात पुण्यात विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यानंतर राज्यात या प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच हा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेचा पेपर फुटल्याचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणात आयोगातील काही अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर संतप्त विद्यार्थ्यांनी आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या मागणीसाठी पुण्यात विद्यार्थ्यांनी सलग दहा दिवस आंदोलन केले. आयोगातील गैरप्रकार आणि पेपरफुटी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे आश्वासन सरकारने दिले. त्याचवेळी विवेक भीमनवार यांनी रजेवर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.

भीमनवार यांच्या अनुपस्थितीत आयोगाचे कामकाज सुरळीत सुरू राहावे, यासाठी आता सदस्य सतीश बबन वाघोले यांच्याकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. सतीश बबन वाघोले सप्टेंबर २०२६ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून रुजू झाले होते. ७ सप्टेंबर रोजी विवेक भीमनवार यांनीच त्यांना सदस्यपदाची गोपनीयतेची शपथ दिली होती. अवघ्या महिनाभरातच बदललेल्या परिस्थितीत वाघोले यांच्याकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.