
चिपळूण तालुक्यातील कापसाळ येथे मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या जिल्हा परिषद मराठी शाळेच्या बंद व मोडकळीस आलेल्या इमारतीच्या जागी आता बचत उद्योग भवन उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांनी यासाठी सातत्याने केलेला पाठपुरावा, विविध परवानग्यांसाठी प्रशासकीय स्तरावरील केलेल्या संघर्ष आणि प्रयत्नांना अखेर यश आले असून, या भवनाचे काम सुरू झाले आहे.
कापसाळ येथील जिल्हा परिषद मराठी शाळेची इमारत पटसंख्येअभावी तसेच मोडकळीस आल्यामुळे बंद अवस्थेत होती. मुंबई-गोवा महामार्गाच्या कामासाठी भूसंपादन करताना या परिसरातील काही जमीन संपादित करण्यात आली होती. या भूसंपादनापोटी जिल्हा परिषदेला मिळालेल्या मोबदल्यातून शाळेच्या इमारतीऐवजी गावातील महिलांसाठी बचत उद्योग भवन उभारण्यात यावे, अशी आग्रही मागणी कापसाळ गावातील विविध बचतगटांमध्ये कार्यरत असलेल्या शेकडो महिलांनी आमदार भास्कर जाधव यांची भेट घेऊन केली होती.
महिलांची ही मागणी लक्षात घेऊन आमदार भास्कर जाधव यांनी बचत उद्योग भवन उभारून देण्याचा शब्द दिला. त्यानंतर त्यांनी ग्रामस्थ, बचत गटांच्या महिला व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष जागेची पाहणी करून या कामाचा आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या.मात्र, शाळेच्या इमारतीऐवजी त्या जागेवर उद्योग भवन उभारण्यासाठी मंत्रालय स्तरावर ग्रामविकास तसेच महिला व बालकल्याण विभागाशी संबंधित विविध प्रशासकीय परवानग्या मिळवणे आवश्यक होते. ही प्रक्रिया सोपी नसतानाही आमदार भास्कर जाधव यांनी संबंधित विभागांचे तत्कालीन मंत्री आणि सचिव यांची वारंवार भेट घेऊन, तसेच सातत्याने पत्रव्यवहार करून या परवानग्या मिळवण्यासाठी प्रयत्न केले.
सर्व आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतरही जागा आणि आराखड्यासंदर्भात काही तांत्रिक व प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्या. या अडचणी दूर करण्यासाठी आमदार भास्कर जाधव यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा विषय ठामपणे मांडला. तसेच जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी सातत्याने संपर्क साधून प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला.
अखेर सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली असून, कापसाळ येथील बचत उद्योग भवनाच्या कामाला सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला. या भवनामुळे गावातील बचतगटांमधील महिलांना उद्योग, रोजगार आणि आर्थिक स्वावलंबनासाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.या कामासाठी पुढाकार घेऊन महिलांची मागणी पूर्णत्वास नेल्याबद्दल कापसाळ गावातील बचतगटांच्या महिलांनी आमदार भास्कर जाधव यांचे आभार मानले आहेत.



























































