
हिंदुस्थानमध्ये स्तनाच्या कर्करोगाच्या (Breast Cancer) रुग्णसंख्येत गेल्या काही दशकांत मोठी वाढ होताना दिसते. दरम्यान 2050 पर्यंत या आजाराच्या रुग्णसंख्येत आणखी मोठी वाढ होऊ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात आला. या आजारासाठी प्रामुख्याने सर्जरी, किमोथेरपी घ्यावी लागते. एकीकडे रुग्णसंख्येत वाढ होत असताना वैद्यकीय संशोधनाच्या क्षेत्रातून एक अत्यंत दिलासादायक माहिती समोर आली आहे. मधमाशांच्या विषामध्ये असणाऱ्या एका विशेष घटकामुळे स्तनाच्या कर्करोगाच्या अतिशय धोकादायक आणि आक्रमक पेशी नष्ट होऊ शकतात, असा दावा एका वैज्ञानिक संशोधनात करण्यात आला आहे. या संशोधनामुळे कर्करोग उपचारांच्या नव्या दिशा उघडल्या असून वैद्यकीय जगतात मोठी चर्चा रंगली आहे.
एबीपीने दिलेल्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियातील हैरी पर्किन्स इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल रिसर्च आणि युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियामधील वैज्ञानिकांनी हा महत्त्वपूर्ण शोध लावला आहे. या संपूर्ण संशोधनामध्ये मधमाशांच्या विषातील ‘मेलिटिन’ (Melittin) नावाच्या प्रमुख घटकावर प्रामुख्याने अभ्यास करण्यात आला. हा एक असा घटक आहे जो विषाच्या एकूण कोरड्या वजनाच्या सुमारे 40 ते 50 टक्के भाग व्यापतो. वैज्ञानिकांच्या मते, या घटकामध्ये कर्करोगाच्या पेशींच्या बाह्य आवरणाला नष्ट करण्याची आणि त्यांना मुळापासून संपवण्याची क्षमता असते.
मधमाशांच्या विषाचे अचूक प्रमाण वापरल्यास कर्करोगाच्या पेशी पूर्णपणे नष्ट करता येऊ शकतात, संशोधनादरम्यान अशी माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, उपचारादरम्यान या विषाचा शरीरातील इतर निरोगी आणि चांगल्या पेशींवर अत्यंत नगण्य किंवा कमीत कमी दुष्परिणाम होतो, ही या संशोधनातील सर्वात मोठी जमेची बाजू मानली जात आहे.
स्तन कर्करोगाचे ‘ट्रिपल-नेगेटिव्ह’ (Triple-Negative) आणि ‘एचईआर२-एनरिच (HER2-enriched) हे प्रकार अत्यंत घातक मानले जातात, ज्यांवर उपचार करणे डॉक्टरांसाठी मोठे आव्हानात्मक असते. परंतु, मधमाशांमधील हे विष आणि त्यातील ‘मेलिटिन’ घटक या दोन्ही प्रकारच्या दुर्धर कर्करोग पेशींची वाढ रोखण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरल्याचे प्रयोगातून सिद्ध झाले आहे.
दरम्यान हे संशोधन आणि प्रयोग प्राथमिक स्तरावर अत्यंत यशस्वी ठरले असले, तरी प्रत्यक्ष क्लिनिकल ट्रायल आणि मानवी शरीरावर याचा वापर करण्यासाठी अधिक अभ्यासाठी गरज आहे. भविष्यात या नैसर्गिक घटकाचा वापर करून कर्करोगावर अतिशय अचूक, सुरक्षित आणि प्रभावी औषध तयार केले जाईल, असा विश्वास संशोधक व्यक्त करत आहेत.


























































