कायदेशीर सल्ला – जोडीदाराची क्रूर वागणूक घटस्फोटाचे कारण ठरू शकते

>> अ‍ॅड. संजय भाटे

प्रश्न – माझा विवाह झाल्यापासूनच पत्नी दांपत्य जीवनातील प्रणय असो वा शारीरिक समागम असो, याबाबत नेहमीच अनुत्सुक व थंड असे. बेडरूमध्ये एकांत असताना नेहमी काहीना काही सबबी वा कारणे देऊन पत्नीचा नकार वा टाळाटाळच असे. नेहमी मलाच यात पुढाकार वा काही वेळाला जबरदस्ती करावी लागे. तिचा असा प्रतिसाद नसेच. अर्थात त्यामुळे मी समागमातील आनंद व शारीरिक मीलनातील उत्कंठता कधीच अनुभवली नाही. पत्नीच्या या अशा वर्तनामुळे शरीराचा, मनाचा व भावनेचा कोंडमारा होत असे. काही वेळेस हे बाहुलाबाहुलीचे वैवाहिक संबंध संपुष्टात आणावेत असे वाटे, पण दोन मुलींच्या पितृत्वाची जबाबदारी, आयुष्य व संसाराची गाडी विस्कळत होण्याची भीती यामुळे प्रत्यक्षात काही निर्णय घेतला नाही.

दहाएक वर्षांपूर्वी मला वयाची पन्नास वर्षे पूर्ण झाली. तेव्हापासून तर पत्नीने शारीरिक संबंध तर पूर्णपणे तोडून टाकलेच, पण  माझ्याशी नवरा या नात्याने सहज व खुलेपणाने बोलणे, हास्यविनोद (जे पूर्वीही फारसे नव्हते) ते सारे बंद केले. आमच्या संबंधांत प्रणय तर कधीच नव्हता. माझ्या पत्नीचे वर्तन हे एखाद्या ‘केअरटेकर’सारखे आहे. सुरुवातीस तिला याबाबत विचारले असता तिने आपली ‘रजोनिवृती’ आल्याचे सांगितले. याबद्दल तिला स्त्राrरोगतज्ञाचा सल्ला घे, असे सांगितले असता तिने सुरुवातीस “हो, हो’’ म्हणत टाळाटाळ केली. नंतर ती या विषयावर रागावू लागली, हिंसक होऊ लागली. नंतर तर तिने कहरच केला. तिने मला सांगितले की, “आता तुमचा आयुष्यातील ‘वानप्रस्थाश्रम’ सुरू झाला आहे. त्यामुळे आता तुम्ही दांपत्य जीवन संपुष्टात आणावे.’’ तेव्हापासून गेली दहा वर्षे असे हे एकांडे जीवन जगत आहे. दोन्ही मुलींची लग्ने झाली आहेत व त्या आपल्या संसारात मश्गूल आहेत.

मी आता साठ वर्षांचा आहे व मनाने, शरीराने तंदुरुस्त आहे. मला एका प्रेमळ सहचारिणीची सोबत हवी आहे. पत्नी त्यात पूर्णपणे विफल झाली आहे. मी आता माझ्या निर्णयावर ठाम आहे, पण तत्पूर्वी माझ्या  पत्नीची अशी वागणूक व वर्तनामुळे न्यायालयातून घटस्फोट मिळेल का?

– एक पीडित वाचक

सर्वप्रथम तुम्ही तुमची ही समस्या मांडलीत याबद्दल अभिनंदन. अशा समस्या असलेले अनेक पती व पत्नी असतात, पण समाज काय म्हणेल वा मुलांना काय सांगायचे, या दबावात ते आयुष्यभर स्वतःचा शारीरिक व भावनिक कोंडमारा करून घेत आयुष्य ‘ढकलतात.’ ज्या व्यक्तींनी आरोग्यपूर्ण जीवनशैली अंगीकारून आपल्या शारीरिक तंदुरुस्तीकडे लक्ष दिले, त्या व्यक्ती अगदी साठीनंतरदेखील कामक्रीडेमध्ये सक्रिय व इच्छुक असतात. त्यामुळे व्यक्तीच्या भावनिक व शारीरिक आरोग्यासाठी शारीरिक समागम आवश्यकच असतो.

प्रेम, प्रणय व कामजीवन हा वयसापेक्ष विशेषाधिकार. वय हा केवळ क्रमांक आहे. तो काही आपला जीवन जगण्यातील अडथळा नाही. त्यामुळे साठीनंतरदेखील प्रेम, प्रणयपूर्ण व लैंगिक तृप्तीसह आनंदी सहजीवनाची अपेक्षा ठेवणे स्वाभाविक आहे. तुमच्या पत्नीचे कोरडे व थंड वर्तन, विशेषतः लैंगिक समागमास तिचा एकतर्फी नकार ही तिची तुमच्या प्रतीची क्रूरताच आहे. ‘समर घोष विरुद्ध जया घोष’  या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने वैवाहिक संबंधातील मानसिक क्रूरतेची काही उदाहरणे नमूद केलेली आहेत. त्यातील एका उदाहरणानुसार, एका वैवाहिक जोडीदाराने शारीरिक असक्षमता वा अन्य कोणत्याही वाजवी कारणाशिवाय त्याच्या वैवाहिक जोडीदारास लैंगिक संभोगास एकतर्फी नकार देणे ही मानसिक क्रूरता आहे, असे स्पष्ट केले आहे. हिंदू विवाह अधिनियम, 1955 च्या कलम 13 अन्वये घटस्फोटासाठी कायदेशीर वैध आधार देण्यात आले आहेत. त्यानुसार पती वा पत्नी यापैकी कोणत्याही वैवाहिक जोडीदाराने आपल्या अन्य वैवाहिक जोडीदारास क्रूर वागणूक दिली असेल तर ते वैवाहिक विच्छेदासाठी ( घटस्फोट) मान्य कारण आहे.

तुमच्या पत्नीने तुम्हास गेली काही वर्षे कोणत्याही न्याय्य व वाजवी कारणाशिवाय लैंगिक संभोगास नकार दिला आहे. त्यामुळे तुम्हास या कारणावरून आरोप सिद्धीअंती घटस्फोट मिळू शकतो.

[email protected]