मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा! काँग्रेसने केला ठराव 

मणिपूरमधील अत्याचाराची घटना मानवतेला काळिमा फासणारी असून मणिपूरचे अमानवी सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी, असा ठराव कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाने आज केला. धुमसणाऱया मणिपूरबद्दल मोदी सरकारचे मौन आणि निष्क्रियता हिंसाचाराला खतपाणी घालणारी आहे, असे या ठरावात नमूद करण्यात आले आहे. अडीच महिन्यांहून अधिक काळ मणिपूर जळत आहे. कोणत्याही सभ्य समाजाला मुळापासून हादरवणाऱया या घटनेने आम्ही सर्वच स्तब्ध झालेलो आहोत. महिलांसोबत झालेल्या या अत्याचारावर पेंद्रातील आणि राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची बोलती बंद आहे. विधिमंडळात या विषयावर सभासदांचा आवाज दाबला जातोय, असा आरोप करत काँग्रेस विधिमंडळ पक्षाने ठरावाद्वारे मणिपूरच्या घृणास्पद घटनेचा निषेध केला आणि तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.