विचारा तर खरं…

>>उदय पिंगळे, अर्थ अभ्यासक

प्रश्न 1 : एखादी बँक डबघाईस आली अथवा बंद झाली तर त्याच बँकेमध्ये असलेल्या ठेवीस तारण ठेवून कर्ज घेतले असल्यास त्या मूळ ठेव रकमेचे पैसे डीआयसीजीसीकडून खातेदारास मिळतात का?
 निनाद पाटणकर, पुणे.

उत्तर : बँकेत ठेव ठेवणे आणि बँकेकडून कर्ज घेणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. सध्या एका बँकेतील एका ग्राहकाच्या सर्व प्रकारच्या खात्यांना पाच लाख रुपयांचे ठेव विमा संरक्षण आहे. हीच व्यक्ती अन्य खात्यांस विविध क्रमवारीत सहधारक असेल. हिंदू अविभक्त कुटुंबाचा कर्ता एखाद्या भागीदारी व्यवसायात भागीदार असेल किंवा एकल कंपनी म्हणून असेल तर जरी नावाने व्यक्ती तिच असली तरी त्यास स्वतंत्र खातेधारक समजण्यात येते. हा एक वेगळा सविस्तर समजून घेण्याचा मुद्दा आहे. या प्रत्येक ठिकाणी असलेली पाच लाख रुपयांपर्यंत रक्कम संरक्षित आहे. यात खातेधारकाने त्याच्या ठेवीवर कर्ज घेतले असेल तरी काही फरक पडत नाही. विमा पंपनीकडून आपल्याला बँकेस देणे असलेले कर्ज व्याजासाहित वगळून अतिरिक्त रक्कम परत मिळेल. थोडक्यात बँक बंद पडल्याने आपण कर्जमुक्त होत नसून आपल्याला मिळणाऱया विमाहमी रकमेतून बँकेस आपण देणे असलेली रक्कम समायोजित करून शिल्लक रक्कम आपल्याला मिळेल.

प्रश्न 2 : एका कंपनीच्या प्रारंभिक भागविक्रीमध्ये (आयपीओ) मी अर्ज केला होता, त्यासाठी यूपीआय अँबसा पद्धतीने अर्ज केला होता. शेअर्सची अलॉटमेंट प्रक्रिया पूर्ण झाली असून माझ्या खात्यातील ब्लॉक झालेली रक्कम अनब्लॉक झाली नाही किंवा शेअर्स मिळालेले दिसत नाहीत. मी तक्रार कुणाकडे करू?
 प्रशांत फडतरे, पुणे.

उत्तर : आपल्याला शेअर्स मिळाले किंवा नाहीत यासंबंधी आपल्याला संदेश यायला हवा होता. त्याप्रमाणे विहित कालावधीत रक्कम समायोजित होणे किंवा खात्यात दिसणे अपेक्षित होते. यातील काहीच झालेले नाही याची एक शक्यता अशी असू शकते की, आपले डी मॅट खाते वापरात नसल्यास फ्रीज झाले असेल. त्यामुळे मिळालेले शेअर्स कदाचित सस्पेन्स खात्यात असू शकतील तेव्हा प्रथम डिमॅट खाते व्यवस्थित सुरू असल्याची खात्री करून आपल्या फॉर्मच्या संदर्भासह आयपीओच्या रजिस्टारकडे आणि सेबीच्या संकेतस्थळावर जाऊन स्कोअर या तक्रार निवारण मंचावर तक्रार करावी.

वाचकहो, आर्थिक गुंतवणुकीसह आर्थिक समस्यांसंदर्भातील तुमच्या मनातील प्रश्न, शंका [email protected] या ई-मेल आयडीवर पाठवा.