
>> श्रद्धा बेलसरे
प्रशासकीय सेवेत महत्त्वाची जबाबदारी निभावणाऱया महिला शासकीय अधिकाऱयांचे पहिले अखिल भारतीय साहित्य संमेलन नुकतेच दिल्लीत पार पडले. या साहित्य उत्सवात लेखन, काव्य याविषयीचे पैलूंनाही उजाळा मिळाला.
दिल्लीत महिला शासकीय अधिकाऱयांचे पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकतेच संपन्न झाले. छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या 351 व्या जयंती वर्षानिमित्त हे संमेलन आयोजित केले गेले. दोन दिवस चाललेल्या या पहिल्यावहिल्या संमेलनात अनेक कार्पामांची रेलचेल होती. एकाच वेळी दोन सभागृहांत कार्पाम सुरू होते. पुणे येथील ‘सरहद’ संस्था, दिल्लीतील ‘महाराष्ट्र सदन’ आणि मराठी भाषा विभागाच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन आयोजित झाले होते.
कार्पामाची सुरुवात वाजतगाजत ग्रंथदिंडीने झाली. एरव्ही गंभीर चेहऱयाने फाईलच्या गराडय़ात हरवलेल्या महिला अधिकारी उत्साहाने रंगीबेरंगी साडय़ा नेसून आणि फेटे बांधून सहभागी झाल्या होत्या. हलगीच्या तालाने संपूर्ण महाराष्ट्र सदन दणाणून गेले होते. खूप दिवसांनी अनेक मैत्रिणी एकमेकींना भेटत होत्या. जुन्या आठवणी, हास्य आणि गप्पांना ऊत आला होता. पालखी वाजत गाजत सभागृहात आली. सर्वजण स्थानापन्न झाले आणि ऐनवेळी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची आणि प्रमुख पाहुण्याची प्रकट मुलाखत घ्यायचे ठरले.
संमेलनात महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यांत आणि परदेशातही उच्च पदावर काम करणाऱया मराठी अधिकारी सहभागी झाल्या होत्या. ‘अडथळ्यापलीकडचे कर्तृत्व’, ‘शासकीय सेवेतील महिला कर्तृत्वाची वाटचाल’, ‘कार्यालय ते शब्दालय’, ‘महिला अधिकाऱयांचा साहित्यप्रवास’ आणि ‘कार्यालयातील तणाव, आव्हाने, कारणे आणि उपाय’ या विषयांवर झालेले परिसंवाद अतिशय रंगले.
सायंकाळी एक आगळावेगळा कार्पाम झाला. शीर्षक होते- ‘एक मैं और एक तू.’ अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांनी हिंदीतील अनेक कविता सादर केल्या. त्याला तोडीस तोड उत्तरे मराठीतील कविता वाचून मनीषा कुंभार यांनी दिली. ही जुगलबंदी प्रेक्षणीय आणि श्रवणीय ठरली. अनेक अमराठी अधिकारी महाराष्ट्रात येऊन काम करतात आणि इथल्या भाषेशी, संस्कृतीशी समरस होतात. अशाच राधिका रस्तोगी, सुमन रावत आणि आर. विमला यांच्याशी लीना संख्ये आणि स्नेहल पाटील यांनी संवाद साधला आणि त्यांना बोलते केले. उद्घाटनाच्या कार्पामाला मुख्यमंत्र्यांनी अधिकारी लेखकांचे स्वागत केले आणि शासकीय उपामांविषयी लिहिणाऱया लेखिकांना विशेष पुरस्कार देणार असल्याचेही घोषित केले. दुसऱया दिवशी इतर राज्यात/देशात कार्यरत असलेल्या प्रतिभा पारकर, रोहिणी भाजीभाकरे, अनुपमा निलेकर आणि भाग्यश्री बाणायत या अधिकारी माहिलांनी आपले अनुभव सांगितले. याशिवाय ‘महिला सक्षमीकरण आणि मराठी भाषा’ या विषयावरही परिसंवाद झाला.
दुसऱया दिवशी उत्सुकता होती ती मुंबईच्या पहिल्या महिला महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या प्रकट मुलाखतीची. सभागृह खचाखच भरले होते. सगळे त्यांची वाट पाहत होते. पण अचानक जाहीर झाले की, त्यांना मुंबईहून येणे शक्य न झाल्याने मुलाखत आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने म्हणजे ‘व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे होईल. अफाट ज्ञान व अनुभवाचा परिचय देणाऱया त्यांच्या सहजसुंदर शैलीमुळे काही क्षणातच त्यांनी सभागृह ताब्यात घेतले. त्यांनी मुंबई मेट्रोचा साकार केलेला अवघड स्वप्नवत प्रकल्प आणि आता मुंबई महानगरपालिकेसाठी असलेले त्यांचे व्हिजन पत्रकार मृणालिनी नानिवडेकरांनी अलगद उलगडून दाखवले. दुसऱया सभागृहात दोन्ही दिवस कवीसंमेलनाची अनेक सत्रे झाली. ‘महिला अधिकाऱयांचे काव्यमय स्पंदन’, ‘कारभाराच्या कठडय़ावर टेकलेली कविता’, ‘फाईल आणि फर्मान’, ‘दफ्तरातून उमटलेले काव्यपुष्प’ ही सत्रांची नावेसुद्धा फार वेधक होती. कवयित्रींनी विविध विषयांवरच्या कविता वाचून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. संमेलनासाठी सरहद संस्थेचे संजय नहार, लेशपाल जवळगे, सुषमा नहार तसेच सुप्रिया देवस्थळी, आर. विमला, श्वेता सिंगल, हेमराज बागुल यांनी खूप परिश्रम घेतल्याचे जाणवत होते.
महाराष्ट्र सदनाच्या दिमाखदार वास्तूत हे पहिलेवहिले संमेलन पार पडले. आयोजकांनी निवासभोजनाची चोख व्यवस्था ठेवली होती. दरवर्षी असे संमेलन व्हावे. त्यातून सरकारी फायलीत हरवलेल्या महिलांच्या अभिव्यक्तीला व्यासपीठ मिळावे, असे मत अनेकांनी व्यक्त केले.
(लेखिका माजी माहिती संचालक आहेत.)
[email protected]



























































