खाऊगल्ली- मध्यरात्रीनंतरची खाद्ययात्रा

>>संजीव साबडे

मुंबई आणि उपनगरांत राहणाऱयांसाठी रात्रीची खाद्ययात्रा म्हणजे पर्वणी. हे पदार्थ नेहमीचेच असले तरी दिवसभराच्या घाईगर्दीतून विसावलेल्या मुंबईकरांची ही वेगळी खाद्यसंस्कृती अनुभवण्यासारखी असते.

आपण अनेकदा संध्याकाळी व त्याच्या आसपास मित्रमैत्रिणी, घरातली मंडळी यांच्यासह फिरायला जातो. कधी मुलांना नेतो, कधी सिनेमाला जातो. रात्री इतका उशीर होतो की घरी जाऊन स्वयंपाक करण्याची तयारी नसते. रेस्टॉरंट बंद होत आलेली असतात किंवा आपल्याला हवं ते तिथे मिळत नाही. काही वेळा अचानक कामासाठी जावं लागतं आणि ते संपता संपता मध्यरात्र उजाडते. अशा वेळी किंवा एरवीही आपल्याला रस्त्यावरच्या गाडीवर वा टपरीवर चमचमीत, अरबट चरबट खाण्याची इच्छा होते, वा खावं लागतं. कुठे तरी छोटी रेस्टॉरंट सुरू दिसतात. पण ती माहीत असतीलच याची खात्री नाही. त्यामुळे रात्रीची खाद्ययात्रा करण्याचा हा प्रयत्न. अर्थात यातही काही मर्यादित ठिकाणांचीच माहिती असेल. काही शुद्ध शाकाहारी आणि काही मांसाहारी.

रात्री हलकं, साधं जेवण घ्या, असा सल्ला दिला जातो, पण बाहेर आपण बहुतांशी वेळेस त्याच्याविरुद्ध वागतो. त्यामुळे ही ठिकाणंही तशीच आहेत. म्हणजे मुंबईतील ताडदेव येथील पहिलं पावभाजीचं ठिकाण सरदार भाजी पाव. रात्री उशिरा दीड वाजेपर्यंत गेलात तरी तिथे तुम्हाला खायला मिळेल. तुम्ही कुलाबा भागात असाल आणि तुम्हाला मांसाहार करायचा असेल, तर पहिलं ठिकाण म्हणजे ताजच्या मागील टूलक रोडवरील बडे मियां. गेली 77 वर्षं तिथे ते व्यवसाय करत आहेत. विविध प्रकारचे कबाब, बैदा, खिमा, साधा असे वेगवेगळे पराठे, रुमाली रोटी असे असंख्य पदार्थ पहाट होईपर्यंत तुमचे उदरभरण करू शकतील. काळा घोडा परिसरात, ऱिहदम हाऊसपाशी असाल तर आणखी एक उत्तम मांसाहारी उत्तम ठिकाण म्हणजे अयुब रेस्टॉरंट. गेली 39 वर्षे तिथे असंख्य प्रकारचे तंदुरचे कबाब, रोटी, नान. शिवाय रोल, तवा रोटी व खिमा, अंडा आणि पनीर भुर्जी व इतर पदार्थ, बटाटय़ाचे व इतर काही शाकाहारी प्रकार, बिर्याणी असं खूप सारं इथं मध्यरात्रीनंतरही मिळतं. तरुण-तरुणींचं हे आवडतं ठिकाण बनलं आहे. चर्चगेट स्टेशनच्या बाहेर एका स्टॉलपाशी मध्यरात्रीनंतर गर्दी वाढत जाते. तिथे रात्री अडीच-तीन वाजेपर्यंत गरमागरम व अतिशय मस्त आम्लेट पाव व भुर्जी पाव हे प्रकार मिळतात. अनेकदा शेवटची गाडी चुकलेले आणि पहाटेच्या पहिल्या गाडीची वाट पाहणाऱयांचे हे मोठंच आशास्थान आहे. अर्थात बोरीबंदरच्या परिसरातील छोटय़ा गल्ल्यांमध्येही अशी ठिकाणं आहेत. शाकाहारी मस्त चॉइस म्हणजे हाजी अली ज्यूस सेंटर. नावातच ते कुठे आहे हे कळतं. पिझ्झा, बर्गर, चित्रविचित्र रोल्स, सँडविच यांचे मिळून शेकडो प्रकार यांच्या मेन्यूमध्ये आहेत. नावाप्रमाणे जवळपास सर्व फ्रूट ज्युसेस, मिल्क शेक, फालुदा यांनी मेन्यू कार्डाचं मोठं पान भरलं आहे. यांच्याकडील सीताफळ व ड्राय फ्रुट शेक अतिशय लोकप्रिय. शाकाहारींना तृप्त करणारं हाजी अली सेंटर आता वांद्रय़ाच्या पाली हिल भागातही आलं आहे आणि बंगळुरू, हैदराबाद, केरळचं एर्नाकुलम व तामीळनाडूतील सेलममध्येही यांच्या शाखा आहेत.

वांद्रे स्टेशनच्या परिसरात रात्री उशिरा खाण्याची बरीच ठिकाणं आहेत. पण लकी रेस्टॉरंटच्या बाहेरील बाजूस उशिरापर्यंत ज्यूस, केक व काही गोड पदार्थ खायला मिळतात. लकीची बिर्याणी मात्र बारा-साडेबारापर्यंतच. मात्र लकीच्या मागील बाजूला उशिरापर्यंत समोर तळली जाणारी गरमागरम मावा जिलबी मिळते. लिंकिंग रोडवर रात्री फिरत असताना एक अतिशय उत्तम चवीच्या व स्वच्छ चायनीज खाद्यपदार्थांची गाडी दिसेल. सुशांत वा तत्सम नावाचा माणूस हा धंदा तिथे करतो. मस्त व मध्यरात्रींनंतर सुरू असणारं अजून एक ठिकाण म्हणजे जुहूच्या कूपर हॉस्पिटलच्या बाहेरचं अमर ज्यूस सेंटर. सकाळी 11.30 वाजता सुरू होऊन पहाटे तीनपर्यंत हे सुरू असतं. इथं सँडविच, बर्गर, पिझ्झाबरोबरच इडली, 15/20 प्रकारचे डोसा व उत्तप्पा, टोमॅटो आम्लेट, फ्रँकी, भाजीपावचे 20/25 प्रकार, वेगवेगळे व्हेज रोल्स हे तर असतंच. पण कुल्फी, आइपीम, मिल्क शेक्स, फ्रूट ज्युसेस आणि फालुदा असे जीव थंड करणारे अनेक प्रकारही इथे असतात.

अंधेरी स्टेशनच्या पश्चिमेला बाहेर बेस्ट पनीर भुर्जी मिळते. सुरेश नावाच्या व्यक्तीची ती गाडी आहे. पहाटे तीन वाजेपर्यंत तुम्हाला तिथे खायला मिळू शकतं. त्याच्या जवळच दुसऱया गाडीवर मस्त नॉनव्हेज प्रकार मिळतात. पनीर भुर्जा खायला लोक तिथे मुद्दाम येतात. तिथूनच जवळ स्वामी विवेकानंद रस्त्यावर आहे प्रसिद्ध फिरदौस बेकरी. तिथे एक ते दीड वाजेपर्यंत मस्त फिरणी खायला मिळेल. फिरणीबरोबर अनेक मिठाया व केकही या बेकरीत आहेत. पूर्व उपनगरातही रात्री उशिरा खायला मिळतील अशी असंख्य ठिकाणं आहेत. कुर्ल्याला जर लालबहादुर शास्त्राr मार्गावर असाल तर नॉन-व्हेज पदार्थ खाण्यासाठी फ़ूड किंग रेस्टॉरंटमध्ये रात्री एक वाजताही जायला हरकत नाही. तंदुरमधील अनेज कबाब व रोटी, नान, तसेच बटर चिकन, बिर्याणी, व्हेज व नॉन व्हेज रोल्स हे चमचमीत व खमंग पदार्थ तिथे असतात. कल्पना टॉकीजजवळ नवाब सीग कॉर्नर रेस्टॉरंट मध्यरात्रीनंतरही सुरू असतं. उत्तम मांसाहारी पदार्थ व तंदूर कबाब ही येथील खासियत.

घाटकोपरला रात्री दोन वाजता उत्तम शाकाहारी खाद्यपदार्थ मिळण्याचं ठिकाण म्हणजे ‘अचिजा’ पावभाजी. घाटकोपर पूर्वेच्या गरोडियानगर भागातील अचिजाकडे पावभाजी, पुलाव, पिझ्झा, सँडविच व विविध रोल्स मिळतात. हे लोकप्रिय ठिकाण संध्याकाळी सुरू होतं. चेंबूरच्या कॅम्प भागात असलेलं छोटे नवाब रेस्टॉरंट मध्यरात्री दीड वाजेपर्यंत सुरू असतं. मुघलाई व चायनीज मांसाहारी व शाकाहारी खाद्यपदार्थ आणि ब्राउनी, कॅरमल कस्टर्ड, गुलाब जामून, विविध आइपीम असे जिभेची इच्छा पूर्ण करणारे प्रकार तिथे मिळतात. मुलुंड पश्चिमेला राजेंद्र प्रसाद रोडवर, वर्धमान नगर परिसरात रेकडे हे खाद्यपदार्थांचे ठिकाण 24 तास सुरू असतं. टेस्ट ऑफ स्ट्रीट फूड असं त्यांनी दुकानावर लिहिलं आहे. मिसळ पाव, तर्री पाव, पिझ्झा, पिंक पास्ता, मेल्टेड चीज, मेक्सिकन चिली राईस, मसाला पाव, डोसा असे अनेक प्रकार तुम्हाला तिथं मिळू शकतात.

पवईच्या हिरानंदानी गार्डन भागातील ज्वेल फूड कोर्टही 24 तास सुरू असतं. तिथं चहा, कॉफी, बन मस्का, शावरमा, मोमोज, सँडविच, दक्षिण भारतीय प्रकार असा मोठा मेन्यू आहे. पण रात्री चहा, कॉफी, सँडविच, मोमोज हेच प्रकार मिळतात.

[email protected]