प. बंगालच्या राज्यपालांविरुद्ध विनयभंगाच्या आरोपांची चौकशी होणार; सूत्रांची माहिती

Bengal Governor CV Ananda Bose

कोलकाता पोलिसांनी शुक्रवारी पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंदा बोस यांच्यावर राजभवनच्या एका महिला कर्मचाऱ्यानं केलेल्या विनयभंग आणि छळाच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी पथक (SET) स्थापन केल्याचं वृत्त सूत्रांच्या हवाल्यानं इंडिया टुडेनं प्रसिद्ध केलं आहे.

डीसी (मध्य) इंदिरा मुखर्जी यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकानं या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तपास जसजसा पुढे जाईल तसतसे आणखी कर्मचाऱ्यांची पोलिसांकडून चौकशी होण्याची शक्यता आहे, असंही सूत्रांनी सांगितलं.

एका महिला कंत्राटी कर्मचाऱ्याने हेअर स्ट्रीट पोलीस स्टेशनमध्ये बोस यांच्यावर विनयभंग केल्याचा आरोप करत पोलीस तक्रार दाखल केल्याच्या एका दिवसानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींसह तृणमूल काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी या घटनेची ‘भयानक आणि भयावह’ अशा शब्दात निंदा केली.

कोलकाता पोलिसांनीही तक्रारदाराला सुरक्षा पुरवली आहे.

या आरोपांवर प्रतिक्रिया देताना, बोस म्हणाले की, असे आणखी आरोप होतील अशी त्यांची अपेक्षा होती.

आपल्यावरील आरोपांचे वर्णन करताना, बोस म्हणाले की, ‘भ्रष्टाचार उघड करण्याच्या आणि हिंसाचाराला आळा घालण्याच्या त्यांच्या दृढ प्रयत्नांपासून कोणीही त्यांना रोखू शकणार नाही’.

‘काही राजकीय शक्तींनी माझ्यावर केलेल्या सर्व आरोपांचे आणि वारंवार केल्या जाणाऱ्या आरोपांचे मी स्वागत करतो. माझ्या मित्रांनो, मला समजले आहे की आणखी काही घडत आहे. पण एक गोष्ट स्पष्ट आहे की, कोणतेही नाटक मला माझ्या कामापासून परावृत्त करणार नाही. भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्यासाठी आणि हिंसाचाराला आळा घालण्यासाठी मी निश्चित प्रयत्न केले आहेत’, असं बोस यांनी राजभवनाने जारी केलेल्या रेकॉर्ड केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

चारित्र्यहनन हा ‘अयशस्वी दुष्कृत्येचा शेवटचा उपाय’ असल्याचा दावा करून ते म्हणाले, ‘राजभवनात आणखी एक भयंकर कट रचला गेला आहे.’

‘मी अनेक वादळांचा सामना केला आहे. माझ्या विरोधात कारस्थान करणाऱ्या राजकीय पक्षाला मी सांगतो, हे काही मला नवीन नाही. हे फक्त चहाच्या कपातलं वादळ आहे. सर्व शस्त्रे बाहेर काढा. तुमचा शस्त्रास्त्र माझ्या विरोधात वापरा, मी माझ्या बांधवांच्या सन्मानासाठी लढायला तयार आहे’, असं ते म्हणाले.

दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी एका महिला कर्मचाऱ्यासोबत केलेल्या गैरवर्तनाबद्दल त्यांच्यावर जोरदार टीका केली.

‘काल, राजभवनात काम करणारी एक तरुणी बाहेर आली आणि राज्यपालांच्या छळाच्या विरोधात बोलली. महिलेच्या अश्रूंनी माझे हृदय तुटले. मी तिची व्हिडीओ साक्ष पाहिली आहे’, असं त्यांनी पूरबा वर्धमान येथे एका सभेला संबोधित करताना सांगितलं.

काल रात्री राजभवनाला भेट देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी या मुद्द्यावर गप्प का बसले, असा सवालही मुख्यमंत्र्यांनी केला.

‘महिला रडली आणि राजभवनात काम करायला खूप घाबरत असल्याचं सांगून बाहेर निघून गेली. तिने सांगितलं की, तिला भलत्या वेळेला बोलावून त्रास दिला गेला आणि हेच लोक आमच्या माता-भगिनींच्या प्रतिष्ठेबद्दल बोलतात?’, असा सवाल त्यांनी केला.