रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणातून स्मृती इराणी, बंडारू दत्तात्रय सहीसलामत सुटले 

तेलंगणासह सर्व देशाला हादरवणाया आणि मोदी सरकारला अडचणीत आणणाऱ्या रोहित वेमुला आत्महत्येप्रकरणात रोहित दलितच नसल्याचा खळबळजनक क्लोजर रिपोर्ट पोलिसांनी दिल्यामुळे केंद्रीयमंत्री स्मृती इराणी, भाजप नेते बंडारू दत्तात्रय यांच्यासह सर्वच आरोपी सहीसलामत सुटले आहेत. तेलंगणातील मतदानाआधी हा रिपोर्ट ’उघडकीस’ आला आहे.

वेमुलाने 17 जानेवारी 2016 रोजी आत्महत्या केली होती. त्यानंतर अडचणीत आलेल्या मोदी सरकारला दलितविरोधी नसल्याचे स्पष्टीकरण द्यावे लागले होते. या प्रकरणी प्रचंड राजकीय वादंग निर्माण झाला होता. आता तेलंगणातील सर्व 17 लोकसभा जागांवर 13 मे रोजी चौथ्या टप्प्यात मतदान होण्याच्या अवघ्या 10 दिवस आधी हा क्लोजर रिपोर्ट उघडकीस आला आहे.

आरोपींमध्ये तत्कालीन पेंद्रिय शिक्षण मंत्री व भाजप खासदार स्मृती इराणी, सिपंदराबादचे तत्कालीन खासदार व पेंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रय, आमदार एन. रामचेंद्र राव आणि हैदराबाद विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू अप्पा राव या भाजप नेत्यांचा समावेश आहे. पोलिसांच्या या क्लोजर रिपोर्टमुळे अर्थातच या सर्वांची सर्व आरोपातून मुक्तता करण्यात आली आहे.

तेलंगणात आता काँग्रेसचे सरकार आहे आणि त्यापूर्वी भारत राष्ट्र समितीचे सरकार होते. . रोहितच्या मृत्यूनंतर न्याय मागणाया आंदोलनांना काँग्रेसने पाठिंबा दिला होता आणि पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी हा मुद्दा संसदेतही उपस्थित केला होता.

काय आहे क्लोजर रिपोर्टमध्ये

पोलिसांनी आठ वर्षांनी ही केस बंद करण्यासाठी 21 मार्च रोजी हा क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. हैदराबाद विद्यापीठाचा विद्यार्थी असलेला रोहित अनुसूचित जातीचा नव्हता आणि त्याचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे पोलिसांनी या अहवालात म्हटले आहे. शिवाय बनावट प्रमाणपत्र उघडकीस येण्याच्या भीतीनेच त्याने आत्महत्या केल्याचेही म्हटले आहे.

अभाविपच्या छळामुळे रोहितने आत्महत्या केल्याचा आरोप

भाजपशी संबंधित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या  सदस्यांनी आणि इतरांनी त्याचा जातीयवादातून  छळ केल्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचा आरोप वेमुलाच्या कुटुंबीयांनी केला होता. माझ्या भावाला कसे लक्ष्य केले, छळले आणि शेवटी मारले गेले याचा तपास करण्याऐवजी पोलिसांनी त्याच्या जात प्रमाणपत्राची चौकशी केली, असे वेमुलाचा भाऊ म्हणाला.