Ashes 2023 – इंग्लंडचा ‘झॅक’ खेळ, क्राऊलीच्या घणाघातामुळे ओल्ड ट्रॅफर्डवर इंग्लंडचे वर्चस्व

अपयशानंतरही कसोटीला रंगतदार आणि आक्रमक खेळ करणारा इंग्लंड लीड्स कसोटीतील यशाने फूल जोशात दिसला. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 317 धावांवर आटोपल्यानंतर सलामीवीर क्राऊलीने ‘झॅक’ खेळ करत इंग्लंडला चौथ्या ‘ऍशेस’ कसोटीच्या दुसऱ्याच दिवशी वर्चस्व प्रस्थापित करून दिले. क्राऊलीने 182 चेंडूंत 189 धावा ठोकत इंग्लंडला 4 बाद 384 अशी जबरदस्त मजल मारून दिली.

बुधवारी ख्रिस व्होक्सने 62 धावांत 5 फलंदाज बाद करत ऑस्ट्रेलियाचा डाव 317 धावांवर संपवला. बुधवारच्या 8 बाद 299 धावांवर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येत केवळ 18 धावांची भर पडली. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंडला बेन डकेटच्या रूपाने तिसऱ्याच षटकात धक्का बसला. तो बाद झाला तेव्हा इंग्लंडच्या केवळ 9 धावा झाल्या होत्या. मात्र त्यानंतर क्राऊली आणि मोईन खानने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना धू धू धुतले. दोघांनी 121 धावांची भागी रचली. मोईन 54 धावांवर बाद झाला. मग झॅकची जोडी जो रुटसह जमली आणि त्यांनी 206 धावांची भागी रचली. आज इंग्लंडने षटकामागे साडेपाच-सहाच्या सरासरीने धावा चोपून काढल्यामुळे ओल्ड ट्रॅफर्डवर क्रिकेटप्रेमींना ‘बॅझबॉल’ कसोटीचा आनंद अनुभवता आला.

ब्रॉडचे 600 बळी

स्टुअर्ट ब्रॉडने ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडला बाद करून आपल्या कसोटी बळींचा आकडा 600 पार नेला. कसोटी इतिहासात तो 600 बळी टिपणारा चौथा गोलंदाज ठरला. तसेच वेगवान गोलंदाज म्हणून तो दुसराच गोलंदाज आहे. ऍण्डरसननेही 688 विकेट घेतल्या आहेत.