आज ऍशेसचा क्लायमॅक्स, इंग्लंडला 10 विकेट्स तर ऑस्ट्रेलियाला 249 धावांची गरज

जे ओल्ड ट्रफर्डला जमलं नाही ते ओव्हलवर करता यावे म्हणून इंग्लंडने ऑस्ट्रेलियासमोर दोन दिवसांत 384 धावांचे जबरदस्त आव्हान ठेवले आहे. मात्र चौथ्या दिवशी पावसाने हजेरी लावली आणि तब्बल 45 षटकांचा खेळ वाया घालवला. त्यामुळे आता ‘अॅशेस’ मालिकेचा क्लायमॅक्स थरार वळणावर पोहोचला आहे. 384 धावांचा पाठलाग करणाऱया ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (59) आणि उस्मान ख्वाजा (69) यांनी जबरदस्त सलामी देताना 135 धावांची अभेद्य भागी रचली. त्यामुळे आता ‘अॅशेस’ मालिका जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला 90 षटकांत 248 धावांचे लक्ष्य गाठायचे आहे, तर इंग्लंडला हवेत सर्वच्या सर्व दहा विकेट्स.

आज इंग्लंडला कसोटीवर पकड मजबूत करण्याची संधी होती, पण त्यांचा एकाही वेगवान गोलंदाजाला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. मात्र मालिकेत अपयशी ठरलेल्या डेव्हिड वॉर्नरने उस्मान ख्वाजासह इंग्लिश आक्रमणाला 38 षटके थोपवून काढले. पण गेल्या तीन कसोटींत 13 विकेट टिपणाऱया मार्क वूडला 33 व्या षटकांपर्यंत गोलंदाजी न देण्याचा बेन स्टोक्सचा निर्णय पचनी पडला नाही. वूडचा संघात समावेश झाल्यापासून इंग्लंडची गोलंदाजी अधिक धारदार झाली आहे. त्याला फक्त 3 षटके गोलंदाजी करता आली. तोपर्यंत ऑस्ट्रेलियाने बिनबाद 135 अशी मजल मारली होती. गेल्या चार कसोटींप्रमाणे पाचवी कसोटीही रंगतदार होणार, हे स्पष्ट आहे. दोन्ही संघांना विजयाची समान संधी असली तरी पावसामुळे थंड पडलेल्या खेळपट्टीवर पहिल्या सत्रात इंग्लंडचे गोलंदाज आग ओकतात की ऑस्ट्रेलियन फलंदाज टिच्चून फलंदाजी करतात, ते उद्या ओव्हलवरच कळेल.