पुरवणी मागण्यांची खैरात आमदार फोडण्यासाठी आणि फुटलेल्यांना सांभाळण्यासाठी!

राज्य सरकारने सादर केलेल्या 41 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या आमदार फोडण्यासाठी आणि फोडलेले आमदार सांभाळण्यासाठी आहेत, असा घणाघात काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आज केला. निधी वाटपातील असमतोल दूर करा, अन्यथा आम्हाला न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. 

विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान बोलताना बाळासाहेब थोरात यांनी निधीच्या असमान वाटपाची यादीच दाखवत सरकारची पोलखोल केली. ते पुढे म्हणाले की, सरकार सत्तेवर येऊन एक वर्ष झाले आहे. या एका वर्षात चार अधिवेशने झाली. मागच्या पावसाळी अधिवेशनात 25 हजार कोटी रुपयांच्या पुरवणी, नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये 52 हजार कोटी रुपयांच्या विक्रमी पुरवणी मागण्या आणि या अधिवेशनात 41 हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या आहे. एका वर्षभरात फक्त पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून एक लाख वीस हजार कोटी रुपये वाटप केले जातात हे राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी चांगले लक्षण नाही. एकूण अर्थसंकल्पाच्या पाच ते दहा टक्के पुरवणी मागण्या असाव्या असे संकेत आहेत, मात्र हे संकेत या सरकारने पायदळी तुडवले. इतिहासात कधीच झाले नव्हते अशी टीका त्यांनी केली.

असमान निधी वाटप झाल्याची उपमुख्यमंत्र्यांची कबुली  

ज्या ठिकाणी आम्हाला (भाजपच्या आमदाराला) 20 ते 25 कोटी मिळाले आहेत त्या ठिकाणी कोणाला (विरोधी पक्षातील एखाद्या आमदाराला) 5 कोटी रुपये देण्यात आले आहेत, हे मी मान्य करतो. ही परिस्थिती विधानसभेतली आहे. पण परिषदेतील आमदारांना निधी दिला जाईल, कोणत्याही मतदारसंघावर अन्याय होणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ. त्यासाठी मी मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी बोलेन, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

विरोधकांच्या मतदारसंघातील जनता कर देत नाही का?

राज्य सरकार विकासकामांसाठी सरकारच्या खजिन्यातून आमदारांना निधी देते. हा पैसा लोकांच्या करातून जमा होतो. त्यावर सरकारची मालकी नसते. मग ज्या विरोधी पक्षातील आमदारांना सरकारने निधी दिलेला नाही, तिकडची जनता कर देत नाही का, त्यांना विकासाचा अधिकार नाही का, असा सवाल करत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी मिंधे सरकारवर निशाणा साधला.  

राज्य सरकारकडून विरोधकांना विकास निधीत डावलले जात असून असमान निधी वाटप करण्यात आलेले आहे. यावरून विरोधी पक्षनेते दानवे यांनी सरकारला धारेवर धरले. दानवे म्हणाले, भाजपच्या आमदारांना 20 कोटी, शिंदे गटाच्या आमदारांना 40 कोटी तर राष्ट्रवादीच्या काही आमदारांना 50-60 कोटी दिले गेले आहे, मात्र विरोधी पक्षांतील आमदारांना साधे दोन ते अडीच कोटींचा निधी दिला गेला आहे. एवढय़ा निधीत लोकांची कामे कशी करायची ते सांगा, असा सवाल दानवे यांनी सरकारला केला. यावेळी भाई जगताप, सचिन अहिर यांनीही प्रश्न उपस्थित केला.