बॅझबॉलचा विजय असो ! इंग्लंडचा तिसऱ्या कसोटीत थरारक विजय

अखेर इंग्लंडच्या ‘बॅझबॉल’ म्हणजेच आक्रमक खेळाचा विजय झाला. 161 धावांत 6 फलंदाज गमावल्यानंतरही हॅरी ब्रुक आणि ख्रिस व्होक्सने आक्रमक खेळ कायम ठेवत केलेल्या 59 धावांच्या भागीने इंग्लंडला केवळ हेडिंग्ले कसोटीच जिंकून दिली नाहीतर ‘ऍशेस’ विजयाच्या आशाही कायम ठेवल्या. ऑस्ट्रेलियाचा 3 विकेट राखून पराभव करताना यजमान इंग्लंडने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-2 असे आपले आव्हान जिवंत ठेवले.

शनिवारी ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 234 धावांत गुंडाळून इंग्लंडने पुन्हा एकदा आपल्या विजयाचा आशा जिवंत केल्या होत्या. शनिवारी बिनबाद 27 अशा स्थितीत असलेल्या इंग्लंडला शेवटच्या दिवशी 224 धावांची गरज होती. इंग्लंड या कसोटीतही आपला आक्रमकपणा कायम ठेवला. झॅक क्रावली आणि बेन डकेटने वन डे स्टाईल खेळ केला, पण डकेटला पायचीत करून मायकल स्टार्कने पहिले यश मिळवले. या कसोटीत पुन्हा आलेला अलीचा त्रिफळा उडवत स्टार्कने दुसरा धक्काही दिला. त्यानंतर क्राउलीचा 44 धावांचा आक्रमक खेळ मिचेल मार्शने थांबवला. इंग्लंडच्या फलंदाजीचा आधारस्तंभ असलेला ज्यो रुटसुद्धा बाद झाल्याने ते 4 बाद 131 असे अडचणीत आले होते.

पहिल्या सत्रात चार फलंदाज बाद करत ऑस्ट्रेलियाने ‘ऍशेस’ विजयाच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले होते. पहिल्या सत्रात 4 फलंदाज गमावूनही इंग्लंडने 27 षटकांत 126 धावा काढल्या होत्या. इंग्लिश फलंदाज कुठेही डगमगले नाही.

उपाहाराआधी दोन धक्के देणाऱ्या स्टार्कने उपाहारानंतरही दोन हादरे दिले. सहा चेंडूंत त्याने 5 धावांत कर्णधार बेन स्टोक्स आणि जॉनी बेअरस्टॉला बाद करून इंग्लंडची 6 बाद 171 अशी बिकट अवस्था केली.

इंग्लंडचा आक्रमकपणा कायम

कसोटी क्रिकेटला रंगतदार करताना इंग्लिश क्रिकेटने तिन्ही कसोटीत आपला ‘बॅझबॉल’ खेळ सोडला नाही. त्यांनी प्रत्येक कसोटीच्या डावात पाचच्या सरासरीने धावा चोपून काढल्या. पहिल्या दोन्ही कसोटीत ऑस्ट्रेलियाने निसटते विजय नोंदविले असले तरी त्यांच्या धावांची सरासरी 3 ते 4 च्या मध्ये होती तर इंग्लंडची पाचच्या पुढे. या कसोटीत पहिल्या डावात 4.51 च्या सरासरीने धावा केल्या तर दुसऱ्या डावात 5 पेक्षा अधिक धावगती ठेवत 50 षटकांतच 251 धावांचे लक्ष्य गाठले.

ब्रुक, व्होक्स आणि वुडची कमाल

उपाहारानंतर चार षटकांतच स्टोक्स आणि बेअरस्टॉला बाद करून ऑस्ट्रेलिया ऍशेसवर आपली पकड घट्ट करत होता. पण तेव्हाच ब्रुक आणि ख्रिस व्होक्सने कमाल केली. दोघांनी केवळ धावाच काढल्या नाहीत तर आपला आक्रमकपणाही दाखवला. त्यांनी 59 धावांची भागी रचून इंग्लंडला विजयाचे स्वप्न दाखवले आणि मग ते साकारही केले. ब्रुकने संकटमोचकाप्रमाणे 75 धावांची झुंजार खेळी करत इंग्लंडच्या विजयाचा पाया रचला आणि त्यावर व्होक्सने कळस चढवला. त्याने 47 चेंडूंत केलेली 32 धावांची नाबाद खेळी निर्णायक ठरली. विजयापासून 21 धावा दूर असताना ब्रुकला बाद करून स्टार्कने डावातील पाचवा फलंदाज बाद केला. पण या विकेटने इंग्लंड जराही भेदरली नाही. गोलंदाजीत चमक दाखवणाऱ्या मार्क वुडने 8 चेंडूंत 16 धावा ठोकत आज विजय आमचाच असल्याचे दाखवून दिले आणि चहापानापूर्वीच विजय साकारला.