काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मनोमिलनाने भाजपच्या पोटात गोळा; बाळ्यामामा म्हात्रेंचे दणक्यात स्वागत

भिवंडी लोकसभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात वाद व्हावेत यासाठी देव पाण्यात बुडवून बसलेले भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांना धक्का बसला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे यांचे भिवंडीत काँग्रेसने दणक्यात स्वागत केले. म्हात्रे यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा निर्धार शहर मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात करण्यात आल्याने भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांच्या पोटात गोळा आला आहे.

महाविकास आघाडीच्या जागावाटपात भिवंडी लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे गेला. ही जागा आपल्याकडे राहावी असा काँग्रेसचा आग्रह होता. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात यावरून रणकंदन पेटेल आणि त्याचा फायदा आपल्याला होईल अशी खुशीत गाजरे भाजपचे उमेदवार कपिल पाटील खात होते. मात्र काँग्रेसच्या भिवंडी शहर मध्यवर्ती कार्यालयात कार्यकर्त्यांचा महामेळावा आयोजित करून महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ्यामामा म्हात्रे यांना निमंत्रित करण्यात आले आणि त्यांचे प्रचंड जल्लोषात स्वागत केले.

ही जागा काँग्रेसला मिळावी यासाठी आम्ही नक्कीच आग्रही होतो, पण देशाच्या पंतप्रधानपदी राहुल गांधी यांना बसवायचे असेल तर उमेदवार कोणीही असो त्याला निवडून आणावेच लागेल असे शिवसेनेच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने आम्हाला पटवून दिले. त्यामुळे आता या निवडणुकीत बाळ्यामामा म्हात्रे यांना निवडून आणण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते पूर्ण ताकदीनिशी झोकून देतील असे शहराध्यक्ष रशीद ताहीर मोमीन यांनी सांगितले. यावेळी रिझवान बुबेरे यांच्यासह प्रदेश कार्यकारिणी सदस्य राकेश पाटील, काँग्रेसचे सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व युवक मोठ्या संख्येने ही जागा काँग्रेसला मिळावी यासाठी आम्ही सहभागी झाले होते.

आरपीआय सेक्युलर पार्टीचा पाठिंबा
आरपीआय सेक्युलर पक्षाने भिवंडीत महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ्यामामा म्हात्रे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अॅड. किरण चन्ने यांनी भूमिका जाहीर केली. यावेळी ठाणे जिल्हाध्यक्ष रवींद्र चंदने, पालघर जिल्हा सरचिटणीस अडकमोल, कल्याणचे डॉ. अशोक बहीरराव, मिलिंद गायकवाड, मेहबुब अन्सारी, अमोल तपासे, विजय भोईर, आदेश चन्ने उपस्थित होते. आंबेडकरवादी जनतेसह अल्पसंख्याक समाजाच्या मतांचे विभाजन टाळण्यासाठीच निर्णय घेतला असून भिवंडी लोकसभेत महाविकास आघाडीच्या बाळ्यामामा म्हात्रे यांना पाठिंबा दिल्याचे किरण चन्ने यांनी सांगितले.

भिवंडी लोकसभा हा काँग्रेस पक्षाचा गड होता, आहे आणि राहील. देशात परिवर्तनाची लाट वेगात आली आहे. त्या लाटेत आम्ही सर्वजण ताकदीनिशी सहभागी झालो आहोत. काँग्रेस व महाविकास आघाडीसह इंडिया आघाडीचा गड अबाधित राहील अशी प्रचार यंत्रणा राबवून महाविकास आघाडीच्या विजयाचा झेंडा फडकवतील. भिवंडी लोकसभेत गेल्या दहा वर्षांपासून कपिल पाटील हुकूमशाही पद्धतीने वागत आहेत. त्यांनी कोणतीही विकासकामे केली नाहीत. फक्त टक्केवारीचेच राजकारण केले. त्यामुळे आता निष्क्रिय खासदारांना घरी बसवून भिवंडीकर परिवर्तन घडवतीलच.
– सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे