धोकादायक झाडे तोडण्यासाठी नऊ हजार मालमत्ताधारकांना पालिकेची नोटीस

वादळी पावसात झाड अंगावर पडून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी पालिकेकडून झाडांचे सर्वेक्षण एक लाखांवर धोकादायक फांद्या-झाडे हटवण्यात आली आहेत. तर खासगी जागेत असणाऱ्या धोकादायक फांद्या-झाडे हटवण्यासाठी नऊ हजार जणांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.

अतिवृष्टी आणि वादळी पावसात झाडांच्या फांद्या किंवा धोकादायक झाड कोसळून जीवित-वित्तहानी होण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्याचे काम करण्यात आले आहे. पालिकेच्या उद्यान विभागाने आतापर्यंत एक लाखांहून अधिक झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी केली आहे. तसेच वाढ झालेल्या फांद्या, मृत झाडे रस्त्यावरून हटवण्यात आले आहेत. तर खासगी जागेत मुंबईभरात 15 लाख 51 हजार 132 झाडे आहेत. या झाडांपासून असणारा धोका टाळण्यासाठी या नोटीस बजावण्यात आल्या आहे. दरम्यान, मुंबईत पावसाळा सुरू झाल्यानंतर गेल्या सुमारे 20 दिवसांत झाड अंगावर पडल्याने चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही जखमीही झाले आहेत. या दुर्घटनांमध्ये खासगी जागेतही असे प्रकार सर्रास घडत असल्याने या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.