
अयोध्येतील राम मंदिरात भाविकांकडून देण्यात आलेल्या देणगीत घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच अता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी खळबळजनक विधान केले आहे. या घोटाळ्याची मला पूर्ण माहिती आहे, पण सध्या मी ती उघड करण्याच्या परिस्थितीत नाही, असे ते म्हणाले. विष्णोहरपूर येथील निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना ब्रिजभूषण सिंह यांनी राम मंदिरातील देणगी घोटाळ्यावर सूचक भाष्य केले.
राम मंदिर देणगी घोटाळा प्रकरणातील सत्य बाहेर आणल्यास मला मोठ्या रोषाला सामोरे जावे लागू शकते, असे ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले. मी खूप कमजोर माणूस आहे. मी जर आता खरं बोललो, तर अडचणीत सापडेन. कारण ज्यांच्याविरोधात मला बोलायचं आहे, ते लोक खूप शक्तिशाली आहेत. सध्या माझ्यामध्ये सत्य बोलण्याचे धैर्य नाही. पण, योग्य वेळ आली की मी नक्कीच सर्व काही बोलेन, असेही ते म्हणाले. ‘टाइम्स ऑफ इंडिया‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
चोरी के बाद ‘चंपत’ हो गये! राम मंदिरातील देणगी घोटाळ्यावरून शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची टीका
दरम्यान, ब्रिजभूषण सिंह यांनी आपल्या विधानात कोणत्याही विशिष्ट व्यक्तीचे किंवा संस्थेचे नाव घेतलेले नाही. मात्र, अयोध्या राम मंदिर निर्माणासाठी गोळा झालेल्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणावर अपहार झाल्याचे आरोप गेल्या काही दिवसांपासून सातत्याने होत आहेत. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षाच्याच एका बड्या नेत्याने शक्तिशाली लोकांचा उल्लेख केल्यामुळे या घोटाळ्यामागे नक्की कोण आहे, याबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
शिक्षणमंत्र्यांची पाठराखण
देशभरात गाजत असलेल्या नीट आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या पेपर फुटीच्या प्रकरणावरही त्यांनी आपले मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची पाठराखण केली. शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला म्हणजे पेपर फुटीची समस्या सुटणार नाही, असे सिंह म्हणाले. पेपर लीक होणे ही एका रात्रीत घडणारी गोष्ट नाही. यामध्ये विविध स्तरांवरील अधिकारी, कर्मचारी आणि दलालांचे एक मोठे संघटित नेटवर्क काम करत असते. या संपूर्ण प्रकरणाची पाळेमुळे खोदून काढून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करणे, हाच या समस्येवरील एकमेव तोडगा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.




























































