चोरी के बाद ‘चंपत’ हो गये! राम मंदिरातील देणगी घोटाळ्यावरून शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अयोध्येतील राम मंदिरात भाविकांकडून देण्यात आलेल्या देणगीत घोटाळा झाल्याच्या आरोपांवरून वाद अधिक तीव्र झाला आहे. या प्रकरणात शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करत गंभीर आरोप केले आहेत.

अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी म्हटले की, अयोध्येत भूमिपूजनाच्या काळापासूनच गैरव्यवहार सुरू असल्याच्या चर्चा होत आहेत. “चोरी झाल्याची बाब आतूनच समोर आली आहे. शिलापूजनाच्या काळापासूनच गैरव्यवहार होत असल्याचे आरोप सातत्याने होत आहेत. दोन-दोन मिनिटांत लाखोंची जमीन कोट्यवधी रुपयांची झाल्याच्या घटना घडल्या. ‘चम्प’ या शब्दाचा अर्थ घेऊन पळून जाणे असा होतो आणि त्यावरूनच ‘चंपत’ हा शब्द तयार झाला आहे,” असा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान, राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास यांचे उत्तराधिकारी महंत कमल नयन दास यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. “या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी झाली पाहिजे. जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी,” अशी मागणी त्यांनी केली.

महंत कमल नयन दास यांनी काही व्यक्तींवर अप्रत्यक्ष टीका करत म्हटले की, “ज्यांच्याकडे पूर्वी साध्या सायकलीवर फिरण्याचीही व्यवस्था नव्हती, त्यांच्याकडे आज मोठमोठ्या इमारती आहेत. आम्हाला मुख्यमंत्री प्रामाणिक असल्याचा विश्वास आहे आणि ते या प्रकरणात योग्य ती कारवाई करतील.” या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचीही मागणी महंत कमल नयन दास यांनी केली.

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी अलीकडेच राम मंदिरात भाविकांकडून देण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या देणगीच्या हिशेबाबाबत प्रश्न उपस्थित केले होते. देणगीच्या रकमेत पारदर्शकता नसल्याचा आणि काही रक्कम गायब झाल्याचा आरोप अखिलेश यादव यांनी केला होता.