कर्जाला घाबरू नका, चांगल्या कर्जातून पैसे निर्माण करता येतात; Rich Dad, Poor Dad च्या लेखकाचा सल्ला

श्रीमंत कसं व्हायचे, अधिक पैसे कसे कमवायचे, कुठे गुंतवणूक करायची, यासंबंधीचे सल्ले देणारे ‘रिच डॅड, पुअर डॅड’ हे पुस्तक जगभरातल्या बेस्ट सेलिंग पुस्तकांपैकी एक आहे. जगाला श्रीमंत कसे व्हायचे याबाबत सल्ले देणारे पुस्तक लिहिणारा लेखक मात्र कर्जाच्या ओझ्याखाली आहे. ‘रिच डॅड, पुअर डॅड’चे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांच्यावर 1.2 अब्ज डॉलर्सचे ( सुमारे 9 हजार 982 कोटी रुपये) कर्ज आहे. परंतु, त्यांना कर्जाची चिंता नाही. उलट रॉबर्ट कियोसाकी लोकांना कर्ज घेण्याचा सल्ला देत आहेत.

प्रसिद्ध लेखक आणि उद्योगपती रॉबर्ट कियोसाकी यांचे एक इन्स्टाग्राम रील व्हायरल होत आहे. यामध्ये ते म्हणत आहे की, माझं कर्ज 1 अब्ज डॉलर्सच्या पुढे गेले आहे. परंतु, मी दिवाळखोर झालो तर बँकही दिवाळखोर होईल. त्यामुळे मला फार काही अडचण नाही. त्याचबरोबर मला या कर्जाची चिंतादेखील करत नाही. कियोसाकी म्हणाले की, बहुसंख्य लोक कर्ज घेऊन त्यांच्यावरील जबाबदाऱ्या वाढवतात. मुळात त्यांनी कर्ज घेऊन संपत्ती वाढवलेली असते. मला नेहमी वाटते की, फेरारी आणि रोल्स रॉयससाख्या आलिशान गाड्या म्हणजे तुमची संपत्ती नव्हे. यांना जबाबदाऱ्या मानायला हवे.

रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितले की ते रोख पैसे साठवून ठेवत नाहीत. ते म्हणाले, मी सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करतो. मी कर्जाला अजिबात घाबरत नाही. कारण कर्ज म्हणजेच पैसे. चांगल्या कर्जातून पैसे निर्माण करता येतात आणि चुकीच्या कर्जातून कमी कमाई होते. मला वाटते की, लोकांनी कर्ज घ्यावीत आणि रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करावी. माझ्याकडे सध्या 100 मिलियन डॉलर्सची संपत्ती आहे. सुरुवातीच्या काळात मला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात मीसुद्धा दिवाळखोरी पाहिली आहे. परंतु, हळूहळू मी त्या समस्येतून बाहेर पडलो आणि यशस्वी झालो. त्यामुळे कर्जाला घाबरू नका, त्यातून संपत्ती निर्माण करा, असा सल्ला ते देत आहेत.

‘रिच डॅड, पुअर डॅड’ हे पुस्तक 1997 मध्ये प्रकाशित करण्यात आले होते. हे पुस्तक आजही मोठ्या प्रमाणात विकले जात आहे. 100 हून अधिक देशांमध्ये 50 हून अधिक भाषांमध्ये हे पुस्तक विकले जात आहे. आतापर्यंत या पुस्तकाच्या 4 कोटींहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत. लोक पैसे कमावण्यासाठी रॉबर्ट कियोसाकी यांनी दिलेले सल्ले वाचतात. अनेकांनी या पुस्तकाचा आणि त्यांनी दिलेल्या सल्लाचा फायदा झाला आहे. आता त्यांनी कर्जाला घाबरू नका, असा सल्ला दिला आहे.