Cricket World Cup 2023 इंग्लंड विजयाचे खाते उघडणार, बांगलादेशसमोर दुसरा विजय नोंदविण्याचे आव्हान

जगज्जेत्या इंग्लंडला सलामीच्याच लढतीत न्यूझीलंडकडून हार सहन करावी लागली होती. पण आता ते बांगलादेशविरुद्ध विजयाचे दिमाखदार पद्धतीने खाते उघडण्यासाठी उत्सुक आहे. अंतर्गत कलहामुळे बिथरलेला बांगलादेश आपल्या दुसऱया विजयासाठी उत्सुक असला तरी इंग्लंडसमोर आव्हान उभे करणे त्यांना कितपत शक्य होईल हे उद्याच कळेल.

काही महत्त्वाच्या गोष्टी

  • इंग्लंड आणि बांगलादेश यांच्यात नेहमीच  इंग्लंडचे पारडे जड. 24 पैकी 19 विजय. केवळ 5 पराभव.
  • इंग्लंडकडे नवव्या स्थानापर्यंत फलंदाजी, पण न्यूझीलंडविरुद्ध मधली फळी कोलमडली. जो रुटचा आणि जॉनी बेअरस्टॉचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांकडून निराशा.
  • गोलंदाजीत वेगवान असो किंवा फिरकी, सारेच खेळपट्टीवर आपला प्रभाव पाडण्यात अपयशी. पण बांगलादेशविरुद्ध व्होक्स, करन आणि वूडकडून जोरदार अपेक्षा.

कर्णधार शाकिब अल हसन आणि मेहदी हसन मिराज हे अष्टपैलू बांगलादेशचे खरे आधारस्तंभ आहेत. दोघांनीही अफगाणिस्तानविरुद्ध अष्टपैलू चमक दाखवली होती. अफगाणी माऱयापुढे तंझिद हसन आणि लिटन दास दोघेही सलामीवीर अपयशी ठरले होते. इंग्लंडविरुद्ध चमकदार कामगिरीची अपेक्षा.

सुंदर आहे, पण खराबही

धर्मशाळेचे हिमाचल प्रदेश क्रिकेट स्टेडियम हे हिंदुस्थानातील सर्वात सुंदर स्टेडियम म्हणून संबोधले जाते. इंग्लिश कर्णधार जोस बटलरनेही या मैदानाचे कौतुक केले. खरोखर स्टेडियम खूप सुंदर आहे, पण मैदानावर असलेले गवत पाहून तळपायाची आग मस्तकात गेल्याची टीका त्याने केली आहे. फलंदाजी ठीक आहे पण आउटफिल्ड अत्यंत खराब असल्यामुळे क्षेत्ररक्षण करताना फार काळजी घ्यावी लागणार आहे. जर तुम्ही एक-एक धाव वाचवण्यासाठी उडी मारणार आहात तर स्वतःवर नियंत्रण ठेवा, असा सल्ला बटलरने दिला. जशी आऊटफिल्ड आयपीएलदरम्यान होती तशी आता नसल्याचेही तो म्हणाला. अफगाणिस्तान-बांगलादेश यांच्यातील सामन्यात अनेक खेळाडू क्षेत्ररक्षण करताना घसरले होते. कुणालाही दुखापत होऊ शकते. पण खेळण्यापूर्वी अशी काळजी घेणे योग्य नसल्याचेही मत त्याने व्यक्त केले. कोणताही संघ एकेक धाव वाचवण्यासाठी प्रयत्न करतो. बांगलादेशविरुद्धही बेन स्टोक्स खेळणार नसल्याचे बटलरने आधीच स्पष्ट केले.