दुखापतीमुळे पांड्याने षटक अर्धवट सोडले, कोहलीने उरलेले बॉल टाकले

हिंदुस्थान आणि बांग्लादेश यांच्यातील सामन्याला सुरुवात झाली आहे. बांग्लादेशने नाणेफेक जिंकत पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सामन्याच्या 9 व्या षटकात हिंदुस्थानी संघासाठी चिंता वाढवणारी घटना घडली. फलंदाजाने मारलेला फटका अडवताना हार्दिकचा पाय मुरगळला. यामुळे हार्दिकला नीट चालताही येत नव्हतं. त्याने त्याही परिस्थिती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला ते जमत नव्हतं. अखेर त्याला मैदानाबाहेर नेण्यात आलं. जेव्हा हार्दिक पांड्या मैदानाबाहेर गेला तेव्हात्याचे 3 चेंडू शिल्लक होते. अखेर त्याचे षटक संपवण्यासाठी विराट कोहलीला बोलावण्यात आलं. बांग्लादेशने 11 षटकांत एकही गडी न गमावता 68 धावा केल्या होत्या.

27 वर्षानंतर पुण्यात विश्वचषकाचा सामना

अलीकडच्या काळात क्रीडानगरी म्हणून उदयास आलेल्या पुण्यात तब्बल 27 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर क्रिकेट वर्ल्ड कपचा थरार रंगला आहे. याआधी फेब्रुवारी 1996 मध्ये वेस्ट इंडीज-केनियादरम्यान पुण्यात नेहरू स्टेडियमवर वर्ल्ड कपचा सामना झाला होता. त्या लढतीत अनपेक्षितपणे केनियाने बाजी मारली होती. गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे (एमसीए) देखणे स्टेडियम क्रिकेटच्या या महाकुंभासाठी सजले आहे. विजयाच्या हॅट्ट्रिकसह सुस्साट सुटलेल्या टीम इंडियाच्या हीरोंना ‘याचि देही याचि डोळा’ बघण्यासाठी क्रिकेटवेडय़ांची मैदानावर हाऊसफुल्ल गर्दी झाली आहे. बांगलादेशला हरवून यजमान संघ विजयाचा चौकार ठोकण्यासाठी आतुर आहे. दुसरीकडे हिंदुस्थानचा विजयरथ रोखण्यासाठी बांगलादेशी खेळाडूही मैदानावर जिवाचे रान करत आहेत.

टीम इंडिया फॉर्मात

हिंदुस्थानने पाच वेळच्या चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवून आपल्या वर्ल्ड कप स्पर्धेचा श्रीगणेशा केला होता. त्यानंतर अफगाणिस्तान व कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचीही दाणादाण उडवून हिंदुस्थानने विजयाची हॅटट्रिक साजरी केलेली आहे. रोहित शर्मा व विराट कोहली हे आजी-माजी कर्णधार फॉर्मात आहेत. शुबमन गिल, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, हार्दिक पंडय़ा, रवींद्र जाडेजा व शार्दुल ठाकूर असा खोलवर फलंदाजीक्रम हिंदुस्थानची ताकद आहे. पंडय़ा, जाडेजा व ठाकूर हे अष्टपैलू खेळाडू संघासाठी प्लस पॉइंट आहेत. त्यामुळे बांगलादेशच्या गोलंदाजीचा खरा कस लागणार आहे. गोलंदाजीतही जसप्रीत बुमराह व मोहम्मद सिराज ही तुफानी जोडगोळीही भन्नाट लयीत आहे. कुलदीप यादव, जाडेजा ही फिरकीच्या जोडगोळीमुळे हिंदुस्थानची गोलंदाजी वैविध्यतेने नटलेली दिसते.

डार्क हॉर्स बांगलादेश

या घडीला कागदावर हिंदुस्थानी संघ बांगलादेशपेक्षा कितीतरी सरस आहे, मात्र बांगलादेशचा संघही डार्क हॉर्स आहे. त्यांचा दिवस असल्यास कुठल्याही संघाला पराभूत करण्याची या संघात क्षमता आहे. मागील काही वर्षांपासून वन डे क्रिकेटमध्ये हा संघ हिंदुस्थानला नेहमी नडताना दिसतोय. नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील गटफेरीच्या लढतीत याच बांगलादेशने हिंदुस्थानला हरविले होते. शिवाय गतवर्षी डिसेंबरमध्ये बांगलादेशने तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत हिंदुस्थानचा 2-1 फरकाने पराभव केला होता. याचबरोबर 2007 च्या वर्ल्ड कपमध्ये याच बांगलादेशने हिंदुस्थानला साखळी फेरीत घरी पाठविले होते. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये आधी बांगलादेशने जगज्जेत्या इंग्लंडवर, तर नवख्या नेदरलॅण्ड्सने बलाढय़ दक्षिण आफ्रिकेचा गेम करीत धक्कादायक निकाल नोंदविले आहेत. त्यामुळे उद्याच्या लढतीत हिंदुस्थानी खेळाडू बांगलादेशला हलक्यात घेणार नाहीत एवढे नक्की.