पंतप्रधान मोदींवर अश्लाघ्य टीका; मालदीवच्या महिला मंत्र्याची हकालपट्टी, दोन नेतेही पक्षातून निलंबित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौर्‍यावरून अश्लाघ्य टीका करणार्‍या मालदीवच्या महिला मंत्री मरियम शिऊना यांची मंत्रिमंडळातून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे. शिऊना यांच्याबरोबरच जाहिद रमीज आणि हसन जिहान या दोन नेत्यांनाही सत्तारूढ प्रोग्रेसिव्ह पार्टीतून निलंबित करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुकतेच लक्षद्वीपच्या दौर्‍यावर गेले होते. मोदी यांच्या या दौर्‍याची छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली. त्यावरून मालदीवच्या महिला मंत्री मरियम शिऊना यांनी अत्यंत आक्षेपार्ह भाषेत टीका केली. त्याबरोबरच जाहिद रमीज यांनी सेवा क्षेत्रात हिंदुस्थान आमची बरोबरी करू शकत नाही, असे खिजवले होते. प्रोग्रेसिव्ह पार्टीच्या शिऊना यांच्यासह दोन नेत्यांनी केलेल्या आक्षेपार्ह टिपणीवर माजी राष्ट्रपती मोहंमद नशीद यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. ही बाब मालदीवची सुरक्षा आणि समृद्धी धोक्यात आणू शकते, असा इशाराही त्यांनी दिला.

तडकाफडकी कारवाई
मरियम शिऊना, हसन जिहान आणि जाहिद रमीज यांच्या टिपणीवरून मालदीवमध्येही सरकारच्या विरोधात प्रतिक्रिया उमटली. हिंदुस्थान सरकारनेही पंतप्रधान मोदी यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेबद्दल आक्षेप नोंदवला. त्यामुळे अडचणीत आलेल्या राष्ट्रपती मोहंमद मोईज्जू यांनी तडकाफडकी मरियम शिऊना यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली तर दोन्ही नेत्यांना पक्षातून निलंबित केले.

बायकॉट मालदीवज्
मालदीवच्या महिला मंत्र्यासह दोन नेत्यांनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या टिपणीचे सोशल मीडियावर संतप्त पडसाद उमटले. नेटकर्‍यांनी ‘बायकॉट मालदीवज् ’ असा हॅशटॅग चालवत संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या.