मंथन – स्वप्नांचे ओअ‍ॅसिस असुरक्षित…

>> डॉ. जयदेवी पवार

अमेरिकेतील लीव्हलँड विद्यापीठात आयटी पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या हैदराबाद येथील विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याने अमेरिकेत शिकणाऱ्या हिंदुस्थानी विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अस्वस्थ करणारी गोष्ट म्हणजे चालू वर्षात 11 हिंदुस्थानी विद्यार्थ्यांचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे हिंदुस्थानी विद्यार्थ्यांच्या मनात असणारी ‘स्वप्नांचे ओआसिस’ अशी अमेरिकेविषयीची धारणा आता सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तितकी सुरक्षित राहिलेली नाही. हिंदुस्थानी तरुण तुमच्या नोकऱ्या खाऊन टाकतील, असे प्रक्षोभक विधान अमेरिकेचा एखादा राष्ट्राध्यक्ष जाहीरपणे करतो तेव्हा लोकांच्या जीवघेण्या प्रतिक्रियेचा फटका कुणाला तरी सहन करावा लागतो. आज हिंदुस्थानच्या गावाखेडय़ांपासून महानगरांपर्यंत शाळकरी, तरुण मुलांमध्ये शिक्षण घेऊन सातासमुद्रापार अमेरिकेला जाण्याची स्वप्ने पेरली जात आहेत, पण हिंदुस्थानींच्या संशयास्पद मृत्यूचा चढता आलेख या स्वप्नांना कात्री लावणारा ठरू शकतो.

अमेरिकेतील लीव्हलँड विद्यापीठात आयटी पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या हैदराबाद येथील विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याने अमेरिकेत शिकणाऱ्या हिंदुस्थानी विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हा 25 वर्षांचा विद्यार्थी गेल्या महिन्यात त्याच्या विद्यापीठाच्या वसतिगृहातून बेपत्ता झाला होता. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याचा मोबाइल 7 मार्चपासून बंद होता.

अस्वस्थ करणारी गोष्ट म्हणजे 2024 या वर्षात केवळ तीन महिने उलटले असताना अमेरिकेमध्ये 11 हिंदुस्थानी विद्यार्थ्यांची हत्या तरी झाली आहे किंवा त्यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. हैदराबादच्या अब्दुल अरफाथच्या कुटुंबीयांनी सांगितले की, एका व्यक्तीने त्याच्याकडे अज्ञात कॉलद्वारे खंडणीची मागणी केली होती. कोणत्या तरी गुन्हेगारी टोळक्याने त्याचे अपहरण केल्याचे बोलले जात होते. पालकांनीही परराष्ट्र मंत्रालयाला या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती. गेल्या महिन्यात 21 मार्च रोजी न्यूयॉर्कमधील हिंदुस्थानी वाणिज्य दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, ते स्थानिक अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहेत. गेल्या आठवडय़ात लीव्हलँडमध्ये उमा सत्य साई या आणखी एका हिंदुस्थानी विद्यार्थ्याचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची चौकशी सुरू असून कारण अद्याप समजू शकलेले नाही. गेल्या महिन्यात हिंदुस्थानातील प्रशिक्षित शास्त्राrय नृत्यांगना अमरनाथ घोष यांची मिसुरी येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. मार्च महिन्यातच हिंदुस्थानी वाणिज्य दूतावासाने वीस वर्षीय हिंदुस्थानी विद्यार्थी अभिजीतच्या मृत्यूची माहिती दिली होती. त्याचप्रमाणे फेब्रुवारीमध्ये समीर कामथ हा 23 वर्षीय अमेरिकन-हिंदुस्थानी विद्यार्थी इंडियाना येथील निसर्ग संवर्धन क्षेत्रात मृतावस्थेत आढळला होता. 2 फेब्रुवारीला वॉशिंग्टनमधील एका रेस्टॉरंटबाहेर आयटी अभियंता  25 वर्षीय विवेक सैनीची एका बेघर व्यक्तीने हातोडीने वार करून हत्या केली होती. सैनीने नुकतेच एमबीएचे शिक्षण पूर्ण केले होते. ज्युलियन फॉकनर नावाच्या बेघर आणि नशेखोर व्यक्तीने सैनीची निर्घृण हत्या केली. विशेष म्हणजे सैनीने या बेघर व्यक्तीला आश्रय देऊन खाऊ-पिऊ घातले होते. जानेवारीत इलिनॉयमध्ये अकुल धवन या 18 वर्षीय विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाला होता.  नील आचार्य नावाचा आणखी एक हिंदुस्थानी विद्यार्थी जानेवारी महिन्यात मृत्युमुखी पडला. इंडियाना राज्यातील पडर्य़ू विद्यापीठात नील शिक्षण घेत होता. पडर्य़ू विद्यापीठातील जॉन मार्टिसन होनर्स महाविद्यालयातून त्याने काम्प्युटर सायन्स आणि डेटा सायन्समध्ये पदवी घेतली होती.  तो बेपत्ता झाल्याचे समोर आले आणि दुसऱ्याच दिवशी त्याचा मृतदेह आढळून आला. गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात 26 वर्षीय आदित्य अदलखाचाही अशाच प्रकारे मृत्यू झाला होता. हिंदुस्थानात वैद्यकीय शिक्षण घेऊन अमेरिकेच्या   सिनसिनाटी विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या आदित्यचा ओहियो राज्यात खून झाला होता. गाडीत बसलेला असताना त्याच्यावर गोळी झाडण्यात आली. आण्विक आणि विकासात्मक जीवशास्त्र विषयात पीएचडी करण्यासाठी आदित्य अमेरिकेत गेला होता.

या सर्व घटना अत्यंत चिंताजनक असून मन विषण्ण करणाऱ्या आहेत. हिंदुस्थानी विद्यार्थ्यांच्या मनात असणारी ‘स्वप्नांचे ओआसिस’ अशी अमेरिकेविषयीची धारणा आता सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तितकी सुरक्षित राहिलेली नाही, हे या घटनांमधून दिसून येते. मागील काळात अमेरिकेच्या एका राष्ट्राध्यक्षांनी “हिंदुस्थानी तरुण तुमच्या नोकऱ्या खाऊन टाकतील’’ असे प्रक्षोभक विधान केले होते. साहजिकच अशा प्रक्षोभक वक्तव्यानंतर उद्भवणाऱ्या जीवघेण्या प्रतिक्रियेचा फटका कुणाला तरी सहन करावा लागतो. वर्णद्वेषी वृत्ती असो, गुह्यांचे जग असो, अमली पदार्थांच्या तस्करांचे जाळे असो किंवा मत्सराची प्रतिक्रिया असो, त्याचा त्रास निरपराध स्थलांतरितांना भोगावा लागतो.

कारणे काहीही असोत, पण आज हिंदुस्थानातील, महाराष्ट्रातील पालक अमेरिकेमध्ये शिक्षण-नोकरीसाठी गेलेल्या मुलांच्या काळजीने भयग्रस्त होत आहेत. आज हिंदुस्थानच्या गावाखेडय़ांपासून महानगरांपर्यंत शाळकरी, तरुण मुलांमध्ये शिक्षण घेऊन सातासमुद्रापार अमेरिकेला जाण्याची स्वप्ने पेरली जात आहेत, पण हिंदुस्थानींच्या संशयास्पद मृत्यूंचा चढता आलेख या स्वप्नांना कात्री लावणारा ठरू शकतो. हिंदुस्थानी पालक अक्षरश सर्वस्व पणाला लावून आपल्या मुलांना शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवतात. त्यासाठी बँकांकडून कर्जे घेतात. मुलगा तिथे शिक्षण घेत असताना पालक पोटाला चिमटा देऊन, काटकसर करून या कर्जाचे हप्ते फेडत असतात. अशा स्थितीत विद्यार्थ्याच्या हत्येने संपूर्ण कुटुंबच दुःखात आणि नैराश्यात बुडून जाते. विद्यार्थ्याचा मृत्यू म्हणजे प्रतिभेच्या सर्व शक्यतांचा शेवट होय. एकीकडे उच्च शिक्षण आणि रोजगारासाठी मोठय़ा संख्येने हिंदुस्थानी विद्यार्थ्यांचे सतत होणारे स्थलांतर हा  आपल्या धोरणकर्त्यांसाठी आत्मपरीक्षणाचा विषय आहे. आपण हिंदुस्थानात आपल्या मातीतल्या, आपल्या तरुणांच्या कलागुणांना अनुकूल शैक्षणिक आणि रोजगाराचे वातावरण का देऊ शकत नाही? हा प्रश्न निर्माण झालेला आहे. नुकतेच एका हिंदुस्थानीचा कारने चिरडून मृत्यू झाल्यावर एका पोलीस कर्मचाऱ्याने याची भरपाई मिळेल, अशी असंवेदनशील टिपणी केली होती. मानवी जीवनाबाबत अमेरिकन समाजाची संकुचित विचारसरणी  या विधानातून दिसून येते. पेप्सिकोच्या माजी सीईओ इंद्रा नुयी यांनी हिंदुस्थानी विद्यार्थ्यांसोबत घडणाऱ्या घटनांवर केलेली टिपणीही विचारात घेण्यासारखी आहे. यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना सावध रहा, सुरक्षिततेसाठी स्थानिक कायद्यांचा आदर करा आणि अमली पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. या टिपणीतील मर्म जरी योग्य असले तरी त्यातून हिंदुस्थानी विद्यार्थी कायदेभंग करत आहेत किंवा अमली पदार्थांच्या आहारी गेले आहेत, असा नकारात्मक संदेशही जाण्याचा धोका आहे. अमेरिकेमध्ये आजघडीला हिंदुस्थानी वंशाचे विद्यार्थी सुमारे 2,75,000 आहेत. अमेरिकेतील एकूण परदेशी विद्यार्थ्यांचा विचार करता हिंदुस्थानी विद्यार्थ्यांचे प्रमाण 25 टक्के आहे. खर्चाच्या बाबतीत दरवर्षी 9 अब्ज कमावतात, असे ओपन डोअर्स अहवालात म्हटले आहे, येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांच्या संशयास्पद मृत्यूंचे सत्र असेच सुरू राहिले किंवा वाढत गेले तर पालकांच्या मनात भीती निर्माण होईल. अमेरिकेतल्या लोकांना स्वातंत्र्य महत्त्वाचे वाटते, परंतु लोकांचा जीव महत्त्वाचा वाटत नाही.

हिंदुस्थानचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी याबाबत नुकतीच टिपणी करताना सरकारसाठी ही चिंतेची बाब असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी धोकादायक ठिकाणे टाळण्याचे आणि दूतावासाने विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या घटनांचा एकमेकांशी संबंध नाही, असेही ते म्हणाले आहेत. तथापि, तरनजितसिंग संधू यांच्या निवृत्तीला तीन महिने उलटले तरी अमेरिकेतील वॉशिंग्टन येथील हिंदुस्थानी दूतावासात पूर्णवेळ राजदूत नेमण्यात आलेला नाही. घडलेल्या प्रकारांची गांभीर्याने दखल घेऊन शासनाने त्याबाबत उपाययोजना करणे गरजेचे आहे, एवढीच यानिमित्ताने अपेक्षा बाळगू शकतो.