वेलडन इंग्लंड; ऍशेसचा क्लायमॅक्स इंग्लंडने जिंकला

2-0 अशा पिछाडीनंतरही पुढील तिन्ही कसोटींवर वर्चस्व राखणाऱया इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा ऍशेस मालिकेचा क्लायमॅक्स 49 धावांनी जिंकला आणि मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवली. गेली ऍशेस मालिका ऑस्ट्रेलियाने जिंकल्यामुळे यंदाची ऍशेस त्यांनीच राखल्या असल्या तरी मनं मात्र इंग्लंडनेच जिंकली आहेत. अखेर त्यांचा बॅझबॉल खेळ ऑस्ट्रेलियापेक्षा सरस ठरला. कसोटीला वेगवान आणि रंगतदार खेळ करण्याचा इंग्लंडचा बॅझबॉल यशस्वी ठरल्यामुळे सारेच क्रिकेटप्रेमी वेलडन इंग्लंड म्हणून त्यांची पाठ थोपटत होते.

पाचव्या आणि अखेरच्या ऍशेस कसोटीच्या शेवटच्या दिवशी विजयाची दोघांना संधी होती. ऑस्ट्रेलियाला 249 धावा हव्या होत्या आणि इंग्लंडला दहा विकेट. ऑस्ट्रेलियाने केवळ 199 धावाच केल्या, मात्र इंग्लंडने दहा विकेट घेतल्या. कालची नाबाद सलामीची जोडी आज पाच धावांची भर घालून फुटली. ख्रिस व्होक्सने सलग षटकांत अवघ्या एका धावेत डेव्हिड वॉर्नर (60) आणि उस्मान ख्वाजा (72) या दोघांना टिपले आणि दिवसाची सनसनाटी सुरुवात केली. त्यानंतर विजयासाठी दोघांमध्ये प्रचंड चढाओढ पाहायला मिळाली. 3 बाद 169नंतर स्टीव्हन स्मिथ आणि ट्रव्हिस हेडने 95 धावांची भागी रचून ऑस्ट्रेलियाच्या विजयाच्या आशांना बळकटी दिली. पण ही जोडी फुटल्यानंतर मोईन अलीने झटपट 3 विकेट घेत इंग्लंडचा विजयाचा मार्ग सोप्पा केला. ऍलेक्स कॅरी आणि टॉड मर्फीने नवव्या विकेटसाठी 35 धावा करून ऑस्ट्रेलियाच्या विजयासाठी काही काळ संघर्ष केला; पण शेवटची कसोटी खेळत असलेल्या स्टुअर्ट ब्रॉडने आपल्या कारकिर्दीतील शेवटचा म्हणजेच 604वा विकेट घेत इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ब्रॉडबरोबर मोईननेही आपली निवृत्ती जाहीर केली. त्याने 3 विकेट टिपले तर ख्रिस व्होक्सने 50 धावांत 4 विकेट बाद करीत सर्वोत्तम कामगिरी केली.