इंग्लंड-आफ्रिकेला प्रोत्साहन देणारी गर्दी वानखेडेवर दिसणार

वर्ल्ड कपचा 19 वा सामना वानखेडे स्टेडियमवर जगज्जेता इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जाणार आहे. आतापर्यंत हिंदुस्थानच्या चार लढतीवगळता अन्य तेराही सामन्यांत आसनक्षमतेच्या निम्मी गर्दीही दिसली नाही. मात्र क्रिकेट संस्कृती असलेल्या मुंबईत वानखेडेवर इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकन संघांना प्रोत्साहन देण्यासाठी किमान अर्धेअधिक स्टेडियम भरलेले असेल, असा विश्वास मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अमोल काळे यांनी व्यक्त केला आहे.

शनिवारी वानखेडेवर वर्ल्ड कपचा पहिला सामना खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी वानखेडेच्या प्रेसिडेंट बॉक्ससह अनेक कॉर्पोरेट बॉक्सना पंचतारांकित हॉटेल्ससारखे सुसज्ज करण्यात आले असल्याची माहिती एमसीए अध्यक्ष काळे यांनी दिली.

तिकीट विक्रीला चांगला प्रतिसाद

वानखेडेवरच्या पहिल्या लढतीला एमसीए सदस्य आणि क्लबकडून चांगला प्रतिसाद लाभला आहे. तसेच ‘बुक माय शो’वरही अपेक्षेपेक्षा चांगली तिकीट विक्री झाल्यामुळे अन्य लढतींत दिसलेला प्रेक्षकांचा निरुत्साह वानखेडेवर दिसणार नाही. तसेच शनिवार असल्यामुळे मुंबईकर हा सामना मोठय़ा संख्येने पाहतील, अशी माहिती एमसीएच्या सूत्राने दिली.

क्रिकेटप्रेमींना मोफत पाणी

सध्या ऑक्टोबर हीटने अवघ्या हिंदुस्थानला त्रस्त केले आहे. मुंबईकरांनाही त्याचा फटका बसणार आहे. सामन्यादरम्यान क्रिकेटप्रेमींचा तहान भागविण्यासाठी मोफत शुद्ध पाण्याची व्यवस्था केली आहे. मात्र ज्यांना बाटलीबंद पाणी हवे असेल त्यांना एक लिटरसाठी शंभराची नोट खर्च करावी लागेल.

तेंडुलकरच्या पुतळय़ाचे अनावरण 1 नोव्हेंबरला

सचिन तेंडुलकरच्या 50 व्या जन्मदिनाची भेट म्हणून एमसीएने वानखेडेवर त्याचा पूर्णाकृती पुतळा उभारला आहे. या पुतळय़ाचे अनावरण हिंदुस्थान-श्रीलंका यांच्यातील लढतीपूर्वी म्हणजेच 1 नोव्हेंबरला क्रिकेटच्या रथी-महारथींच्या उपस्थितीत केले जाणार आहे. सचिनचा हा पुतळा स्टेडियमबाहेर नसून सचिन तेंडुलकर स्टॅण्डजवळच उभारण्यात आला आहे. षटकार ठोकतानाची सचिनची आयकॉनिक पोझ या पुतळय़ासाठी निवडण्यात आली आहे. या ब्राँझ धातूपासून बनविलेल्या पुतळय़ाची उंची 12 फुटांच्या आसपास आहे.