मायदेशी परतण्यापूर्वीच इंग्लंडच्या 9 खेळाडूंना डच्चू वर्ल्ड कपमुळे वन डे संघात मोठा बदल

चार वर्षांपूर्वी मायदेशात कारकीर्दीत पहिल्यांदा वन डे क्रिकेटच्या जगज्जेतेपदाच्या करंडकावर आपले नाव कोरणारा इंग्लंडचा संघ यावेळी हिंदुस्थानातील वर्ल्ड कपमध्ये साखळी फेरीतच गारद झाला. जोस बटलरच्या नेतृत्वाखालील हा संघ नऊपैकी केवळ तीनच साखळी सामने जिंकू शकला. त्यामुळे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने वेस्ट इंडीज दौऱयासाठी निवडलेल्या एकदिवसीय आणि टी-20 संघात मोठे बदल केले आहेत. वर्ल्ड कप संघातील तब्बल नऊ क्रिकेटपटूंना डच्चू देण्याचा तडकाफडकी निर्णय इंग्लंडने घेतलाय.

वर्ल्ड कप खेळणाऱया इंग्लंड संघातील केवळ सहा खेळाडूंना विंडीज दौऱयावरील वन डे मालिकेसाठी संधी दिली आहे. कर्णधार जोस बटलर, हॅरी ब्रुक, सॅम करण, लियाम लिव्हिंग्स्टन, गस एटिंग्सन, ब्रेडन कार्स यांनाच संघात कायम ठेवण्यात आले आहे. उर्वरित खेळाडूंना वगळण्यात आले आहे. ईसीबीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वन डे संघात सहा खेळाडूंना कायम ठेवण्यात आले आहे, परंतु ज्या खेळाडूंची निवड झाली नाही त्यांच्याबद्दल कोणतीही माहिती नाही. इंग्लंडचा वेस्ट इंडीज दौरा 3 डिसेंबरपासून वन डे मालिकेने सुरू होणार आहे. 12 डिसेंबरपासून टी-20 मालिका सुरू होणार आहे.
इंग्लंड एकदिवसीय संघ जोस बटलर (कर्णधार), रेहान अहमद, गुस एटिंग्सन, हॅरी ब्रुक, ब्रायडन कर्स, जॅक क्रॉली, सॅम करण, बेन डकेट, टॉम हार्टले, विल जॅक्स, लियाम लिव्हिंग्स्टन, ऑली पोप, फिल सॉल्ट, जोश टंग, जॉन टर्नर.

इंग्लंडचा टी-20 संघ जोस बटलर (कर्णधार), रेहान अहमद, मोईन अली, गुस एटिंग्सन, हॅरी ब्रुक, सॅम करण, बेन डकेट, विल जॅक, लियाम लिव्हिंग्स्टन, टायमल मिल्स, आदिल रशीद, फिल सॉल्ट, जोश टंग, रीस टोपले, जॉन टर्नर, ख्रिस वोक्स.