कोरोना वाढत असला तरी मुंबईकरांना धास्ती नाही; फक्त 15 टक्के लोकांनी घेतला बुस्टर डोस

कोराना पुन्हा एकदा वेगाने वाढू लागला असला तरी मुंबईकरांना मात्र वाढत्या कोरोनाची धास्ती नाही. कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस 10 जानेवारी 2022 पासून देण्यास सुरुवात केला असताना 94 लाखांवर पात्र लाभार्थ्यांपैकी केवळ 15 ते 16 टक्के जणांनीच बुस्टर डोस घेतला आहे. पालिका, खासगी आणि शासकीय अशा एकूण 94 केंद्रांवर हा बुस्टर डोस मोफत दिला जात आहे. त्यामुळे कोरोनाच्या व्हेरिएंटच्या धोक्यापासून वाचण्यासाठी बुस्टर डोस घ्यावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.

16 जानेवारी 2021 रोजी कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले. यामध्ये 18 वर्षांवरील पात्र लाभार्थ्यांना पहिला आणि दुसरा असे दोन्ही डोस दिल्याने लसीकरण पूर्ण झाले आहे, मात्र आरोग्य तज्ञांनी ‘बुस्टर डोस’ घेणे आवश्यक असल्याच्या सूचना केल्यामुळे 28 एप्रिल 2023 पासून 60 वर्षांवरील नागरिकांना तसेच 23 जून 2023 पासून आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवर काम करणाऱया कर्मचाऱयांना पहिल्यांदाच नाकावाटेही ‘बुस्टर डोस’ देण्यास सुरुवात झाली. मात्र आता 18 ते 59 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना हा डोस दिला जातोय. मात्र याला अत्यल्प प्रतिसाद आहे.

नाकावाटे लसीचा यांना मिळणार लाभ
राज्य शासनाच्या सूचनेनुसार पालिकेकडून 1 नोव्हेंबरपासून इन्कोव्हॅक लसीचा बुस्टर डोस दिला जात आहे. कोविशिल्ड अथवा कोवॅक्सिनची दुसरी मात्रा घेतल्यानंतर सहा महिन्यांनी इन्कोव्हॅक लसीचा हा प्रिकॉशन/बुस्टर डोस घेता येईल.कोविशिल्ड अथवा कोवॅक्सिनव्यतिरिक्त दिलेल्या इतर कोणत्याही लसीसाठी प्रिकॉशन डोस म्हणून इन्कोव्हॅक लस देता येणार नाही. ही लस ऑन द स्पॉट नोंदणी करताच मिळणार, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

लसीकरणाची सद्यस्थिती
14 लाख 90 हजार 595 जणांनी बुस्टर डोस घेतला आहे, तर नोव्हेंबरपासून कोरोना प्रतिबंधक डोस नाकावाटे दिला जात असताना आतापर्यंत केवळ 123 जणांनीच नाकावाटे डोस घेतला आहे.