बोगस आयकर अधिकाऱ्यांचा व्यावसायिकाच्या घरावर छापा

शीव येथे ‘स्पेशल-26’ सिनेमासारखा प्रकार घडला. एका व्यावसायिकाच्या घरात 10 कोटींची रोकड असल्याची टीप मिळताच आठ भामटे आयकर अधिकारी बनून त्या व्यावसायिकाच्या घरावर धडकले. त्यांनी पद्धतशीर व्यावसायिकाच्या घरच्यांना दमात घेऊन 18 लाखांची रोकड घेऊन पोबारा केला. पण मुंबई पोलिसांनी 48 तासांच्या आत भामटे गजाआड झाले.

आयकर अधिकारी असल्याचे सांगत 26 नोव्हेंबरला भामटय़ांची टोळी शीव पूर्वेकडील टी. बी. चिदंबरम मार्गावरील प्रेमसदन इमारतीत राहणाऱया पटवा कुटुंबीयांच्या घरावर धडकली. त्यामुळे पटवा कुटुंबीय गोंधळले. तुमच्या घरात बेहिशेबी मालमत्ता असल्याची माहिती असून ते सर्व समोर आणून ठेवा, असे त्यांनी दरडावले. पटवा यांनी घरात असलेली 18 लाखांची रोकड त्यांच्यासमोर आणून ठेवली. नियमानुसार एक लाखापेक्षा जास्त रोकड घरात ठेवता येत नाही असे सांगत भामटय़ांनी ती रोकड ताब्यात घेतली. पंचनामाचे नाटक केले. तुम्हाला आयकर विभागाकडून नोटीस येईल, मग त्यानुसार तुम्ही चौकशीला या असे सांगून रोकड घेऊन ते पसार झाले. या गुह्यातील तक्रारदार श्रीलता पटवा हिच्या भावाचा मित्र असलेल्या रामकुमार याला माहिती मिळाली की, पटवा यांच्याकडे दहा कोटी रुपयांची रोकड आहे. त्याने ही बाब अभयला सांगितली. मूळ चालक असलेल्या सुशांतने तो आयकर अधिकारी असल्याचे अभयला सांगितले होते. त्यामुळे पटवा यांच्याकडील पैशांची माहिती त्याने सुशांतला दिली. सुशांतने लगेच त्याचे मित्र संतोष, राजाराम, अमरदीप, भाऊराव यांना याबाबत सांगून ‘स्पेशल-26’ प्रमाणे छापा टाकायचा प्लान रचला आणि ठरल्याप्रमाणे गुन्हाही केला.