घसरलेल्या मतदानाच्या टक्केवारीने भाजपचे टेन्शन वाढले; एनडीएची लोकप्रियता ढासळल्याची चर्चा

लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्प्यांचे मतदान झाले आहे. मात्र, या दोन्ही टप्प्यांमध्ये मतदानाची टक्केवारी घसरली आहे. आता निवडणुकांचे पाच टप्पे अद्याप शिल्लक आहे. मात्र पहिल्या दोन टप्प्यात घसरलेल्या मतदानाच्या टक्केवारीने सर्व पक्षांचे टेन्शन वाढले असले तरी भाजपवर सर्वाधिक दबाव आहे. भाजपने यंदा अब की बार 400 पारची घोषणा केली आहे. मात्र, आतापर्यंत झालेल्या सर्वेक्षणात भाजपचे हे स्वप्न पूर्ण होणार नसल्याचे अंदाज वर्तवण्यात आले आहे. त्यातच पहिल्या दोन टप्प्यात मतदानाची टक्केवारी घसरल्याने भाजप टेन्शनमध्ये आहे.

देशभरात उन्हाचा ताप वाढत आहे. त्यामुळे प्रचारसभा आणि रॅलीला म्हणावी तशी गर्दी भाजपला जमवता येत नाही. प्रचारसभेला कमी गर्दी झाल्याने राजस्थानातील भाजपचे मंत्री संतापल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. प्रचारसभेला कमी गर्दी झाली तर मतदार मतदानासाठी येतील, अशी अपेक्षा भाजपला होती. मात्र, पहिल्या टप्प्यात 50 टक्क्यांपेक्षा कमी म्हणजे 49.26 टक्के मतदान झाले. तर दुसऱ्या टप्प्यात 60 टक्क्यांपेक्षा कमी म्हणजे 59.45 टक्के मतदान झाले. या घसरलेल्या टक्केवारीने भाजपचे टेन्शन वाढले आहे.

देशभरात भाजपविरोधात उभारण्यात आलेली इंडिया आघाडी मजबूत स्थितीत दिसत आहे. तर एनडीएमधील घटक पक्षांची लोकप्रियता कमी होत असल्यानेही भाजपला टेन्शन आहे. बिहारमध्ये फोडाफोडीचे राजकारण करत भाजपने नितीश कुमार यांना आपल्या बाजूला वळवले असले तरी त्यांना जनतेकडून फासरा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. त्यामुळे नितीश कुमार भाजपप्रणीत एनडीएत आले असले तरी त्याचा भाजपला फारसा फायदा होणार नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

भाजपच्या प्रचारसभा आणि रॅलीमध्ये कोणताही नवा विषय किंवा विकासाबाबत चर्चा होत नाही. फक्त नवे आश्वासने आणि विरोधकांवर आरोप करण्यात येतात. त्यामुळे सभांनाही गर्दी होत नाही आणि मतदानाची टक्केवारीही घसरली आहे. त्यामुळे जनमताचा नेमका अंदाज भाजपला येत नाही. त्यामुळे सर्वेक्षणात वर्तवलेले अंदाज खरे ठरतील का, या प्रश्नामुळेच भाजपचे टेन्शन वाढले आहे.