कर्नाटकात उलट्या ‘ऑपरेशन लोटस’ला सुरुवात होणार ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2024 साठी निवडणुकीचे बिगुल वाजवले असतानाच, पक्षासाठी दक्षिणेकडील राजकारणात आपले स्थान बळकट करण्याची शक्यता धूसर असल्याचे दिसू लागले आहे. 10 मे रोजी कर्नाटक विधानसभेचा निकाल लागला आणि काँग्रेस सत्तेवर आली. मतदानाचा निकाल जाहीर होऊन तीन महिने उलटूनही भाजपा विधानसभा आणि परिषदेतील विरोधी पक्षनेत्याचे नाव जाहीर करू शकलेली नाही.

काँग्रेस भाजपने राबविलेल्या “ऑपरेशन लोटस” चा बदला घेण्यासाठी तयार असल्याचे बोलले जात आहे. भाजपने निवडणुकीसाठी काँग्रेसमधील आघाडीच्या नेत्यांना फोडून आपल्या पक्षात घेतले होते आणि त्याद्वारे कर्नाटकात सत्ता मिळवली होती. आता परिस्थिती अशी आली आहे की, भाजपचे नेतृत्व आपल्या नेत्यांना आपल्यासोबत ठेवण्यासाठी धडपड करू लागले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी.के. शिवकुमार यांनी एक विधान केले आहे. ‘राजकारणात काहीही घडू शकते आणि काहीही शाश्वत नसते.’ असे शिवकुमार यांनी म्हटले असून त्यांचे हे विधान उलट्या ‘ऑपरेशन लोटसची सुरुवात असल्याचे बोलले जात आहे.

काँग्रेस पक्षाने भाजपमधील नेत्यांना आपल्याकडे वळवण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी काँग्रेसने 13 ते 15 दिग्गज नेत्यांची यादी तयार केली. हे नेते असे आहेत जे स्वबळावर निवडणूक जिंकू शकतात. हे नेते काँग्रेसमध्ये गेले तर काँग्रेसला त्याचा जबर फटका बसेल.

पूर्ण ताकद पणाला लावूनही भाजपला कर्नाटकात पराभवाचे तोंड पाहावे लागले. हा पराभव भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या जिव्हारी लागला आहे. काँग्रेस पक्षाला कर्नाटकात मिळालेल्या विजयामुळे ते आनंदीत झाले आहे. राष्ट्रीय पातळीवर समविचारी पक्षांना एकत्र करत भाजपविरोधात लढण्यासाठी एक आघाडी तयार झाली असून यामध्ये काँग्रेसचाही समावेश आहे. ‘इंडिया’ असं या आघाडीला नाव देण्यात आले आहे. कर्नाटकात माजी मुख्यमंत्री सिद्धरमय्या आणि डी.के.शिवकुमार हे सातत्याने भाजपवर हल्ले करत असून त्यांना तोंड देण्यासाठी भाजपकडे कोणी सक्षम नेतृत्व नाहीये. माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा कधीतरी या दोघांना उत्तर देताना दिसतात. सध्या काँग्रेस नेत्यांना तोंड देण्यासाठी फक्त माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे प्रयत्न करताना दिसत आहेत. विरोधी पक्षनेत्याचे नाव जाहीर न केल्याने काँग्रेसने भाजपची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली आहे. कर्नाटकात विरोधी पक्षनेत्याशिवाय अर्थसंकल्पीय अधिवेशन झाले नाही असं म्हणत काँग्रेस भाजपवर टीका करत आहे.

काँग्रेसने ‘रिव्हर्स ऑपरेशन लोटस’ किंवा ‘ऑपरेशन हॅस्ट’ सुरू केल्याची कर्नाटकातील राजकीय वर्तुळात कुजबुज सुरू असून काँग्रेस भाजपच्या प्रमुख नेत्यांना आपल्याकडे खेचत भाजपचा विजय होणार नाही याची खात्री करून घेत आहे. दक्षिण मतदारसंघातून भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांचा पराभव करण्यासाठी काँग्रेसने ज्येष्ठ भाजप नेते व्ही. सोमन्ना यांच्याशी संपर्क साधल्याचे सूत्रांनी सांगितले. ते म्हणाले की, काँग्रेस माजी आमदार आणि परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांची कन्या सौम्या रेड्डी यांना लोकसभा निवडणुकीत तेजस्वी सूर्या यांच्या विरोधात उभे करण्याचा काँग्रेस विचार करत आहे.