FIFA World Cup 2026 विजेत्याला 476 कोटी, तळाच्या संघालाही 205 कोटी; फिफाने उघडला हजारो कोटींचा फुटबॉल खजिना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
fifa-world-cup-2026-prize-money-winner-to-get-476-crore-bottom-team-205-crore

फीफा वर्ल्ड कपमध्ये जगज्जेतेपद मिरवणाऱ्या संघाच्या गळ्यात सोन्याचा मुकुट चढणार, पण आश्चर्य म्हणजे स्पर्धेत सर्वात शेवटी राहणाऱ्या संघाच्याही खिशात कोट्यवधींची लॉटरी लागणार आहे. म्हणूनच फुटबॉल हा फक्त खेळ नाही, तर जगातील सर्वात श्रीमंत क्रीडा साम्राज्य आहे. फिफाने आपली तिजोरी उघडताना अंतिम विजेत्यासाठी 476 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केलेय, पण त्याच स्पर्धेत शेवटच्या म्हणजे 48 व्या क्रमांकावर राहिलेल्या संघालाही तब्बल 205 कोटी रुपये मिळणार आहेत.

11 जूनपासून अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको यांच्या संयुक्त यजमानपदाखाली रंगणाऱ्या या विश्वचषकात गोलांचा वर्षाव होईलच, पण त्याहून मोठा वर्षाव होईल तो डॉलर्सचा. फिफाने या स्पर्धेत विजेत्यांवर 6240 रुपयांची उधळण केली जाणार असल्याचे जाहीर करत सर्व संघांना खुश केले. कतारमध्ये झालेल्या 2022 च्या वर्ल्ड कपची एकूण बक्षीस रक्कम 440 दशलक्ष डॉलर होती. आता ती थेट 655 दशलक्ष डॉलरपर्यंत नेली आहे. इतक्या पैशांची उधळण एखाद्या जागतिक क्रीडा स्पर्धेत होणं, हेच फुटबॉलच्या आर्थिक सामर्थ्याचं सर्वात मोठं प्रमाणपत्र आहे.

विश्वविजेता संघाला मिळणार आहेत तब्बल 50 दशलक्ष डॉलर, म्हणजे जवळपास 476 कोटी रुपये. एका रात्रीत इतिहास घडवणाऱया संघावर अक्षरशः सोन्याचा पाऊस पडणार आहे. उपविजेत्यालाही 314 कोटी रुपये मिळतील, तर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरील संघ अनुक्रमे 276 आणि 257 कोटी रुपये घेऊन परततील.

फिफाच्या दरबारात अपयशालाही किंमत आहे. स्पर्धेतील 48 वा आणि शेवटचा संघही रिकाम्या हाताने परतत नाही. कामगिरीच्या आधारावर त्याला 9 दशलक्ष डॉलर मिळतील. त्यात पात्रता मिळवल्याबद्दल 10 दशलक्ष डॉलर आणि तयारीसाठी 2.5 दशलक्ष डॉलरची भर पडेल. म्हणजेच एकूण 21.5 दशलक्ष डॉलर्स मिळणार. हिंदुस्थानी चलनात जवळपास 205 कोटी रुपये! म्हणजे ज्या संघाने स्पर्धेत सर्वात खराब कामगिरी केली, तोसुद्धा 200 कोटींपेक्षा जास्त रक्कम घेऊन घरी जाणार आहे. अनेक खेळांमध्ये विजेत्यालाही एवढी रक्कम मिळत नाही.