विखेंच्या सांगण्यावरून जिल्हा बँकेने ‘गणेश’ला कर्ज नाकारले

श्री गणेश सहकारी साखर कारखाना सुरू होण्याच्या दृष्टीने सकारात्मक गोष्टी घडू लागल्या आहेत. मात्र, पद्मश्री विठ्ठलराव विखे-पाटील कारखान्याने जिल्हा बँक, साखर आयुक्त यांना पत्र देऊन ‘गणेश’च्या मार्गात अडथळे निर्माण केले आहेत. मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या सांगण्यावरूनच जिल्हा बँकेने ‘गणेश’ला कर्ज नाकारले आहे. त्यामुळे विखेंच्या दहशतीला सहकार खात्याने बळी पडू नये, अशी विनंती श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना केली.

यावेळी सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी आमदार बाळासाहेब थोरात, कारखान्याचे उपाध्यक्ष विजय दंडवते, डॉ. एकनाथ गोंदकर, बाबासाहेब डांगे, संपत हिंगे, गंगाधर डांगे, महेंद्र गोर्डे, नानासाहेब नळे, बाळासाहेब चोळके आदी उपस्थित होते.

दंडवते म्हणाले, ‘श्री गणेश सहकारी साखर कारखाना सुरू करण्याच्या हेतूने सध्या प्रयत्न सुरू आहेत. मंत्री राधाकृष्ण विखे यांनीही ‘गणेश’ सुरू करण्यासाठी आम्ही पाठीशी राहू, असा शब्द निवडणूक झाल्यावर दिला होता. मात्र, तो शब्द फिरवीत ‘गणेश’च्या मार्गात काटे निर्माण करण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे. श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या कर्जप्रकरणाला जिल्हा बँकेने मंजुरी दिली. त्यानंतर पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील सहकारी साखर कारखान्याने बँकेला पत्र देऊन ‘गणेश’ला कर्ज देऊ नये, असे सांगितले. गणेश कारखान्याकडून अवाच्या सवा रकमेची मागणी केली. नुकतेच पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील कारखान्याने गणेश कारखान्याला पत्र देऊन 50 कोटी रुपये घेणे असल्याचे कळविले. गणेश कारखान्याला कर्ज मिळू नये, यासाठी चाललेला हा आटापिटा आहे.’, असे ते म्हणाले.

जिल्हा बँकेने राजकारण केले

नगर जिल्हा बँकेने श्री गणेश कारखान्याला कर्ज मंजूर केले आणि दुसरीकडून अटींचा खोडा घातला. त्यामुळे जिल्हा बँकेचा हेतू स्पष्ट दिसून येत आहे. हे सर्व कोणाच्या सांगण्यावरून सुरू आहे, हे न समजायला जनता दूधखुळी नाही, असा आरोप डॉ. एकनाथ गोंदकर यांनी केला आहे.