नाचता नाचता तरूणी कोसळली, वाचा पुढे काय झालं…

वयस्कर व्यक्तींना हृदयविकाराचा झटका येणे एकप्रकारे सामान्य मानले जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून विशेष करून कोरोना महामारीच्या नंतर 18 ते 30 वय असणाऱ्या तरुणांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. असाच एका प्रकार आता मेरठमध्ये घडला असून नाचता नाचता एका तरुणीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये घडली आहे. शनिवारी (27 एप्रिल 2024) एका विवाह सोहळ्या निमीत्त हळदीचा कार्यक्रम होता. या सोहळ्याला वधूच्या चुलत बहिणीची मुलगी रिमशा ही इतर मुलींसोबत नाचत होती. मात्र अचानक नाचता नाचता रिमशा खाली पडली. इतरांनी तिला उठवण्याचा प्रयत्न केला मात्र तिने काहीही प्रतिसाद दिला नाही. रिमशाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. रिमशाचा मृत्यू ह्रदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र रिमशाच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. तसेच विवाह सोहळा सुद्धा पुढे ढकलण्यात आला आहे.