
नागपूरसह विदर्भाला पावसाने झोडपले असून गडचिरोली जिल्ह्यात अक्षरशः हाहाकार माजवला आहे. अनेक भागांत नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागल्याने पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. शहरांसह ग्रामीण भागातील सखल वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली.
गडचिरोली जिल्ह्यात बुधवारी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे. काही गावांचा संपर्क तुटला आहे. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. वैनगंगा नदीच्या गोसेखुर्द (घापेवाज) बॅरेजचे १७ दरवाजे उघडण्यात आले आहेत.
पुढील २४ तासांत ‘फ्लॅश फ्लड’
‘फ्लॅश फ्लड गायडन्स सेल’ने आज एक राष्ट्रीय बुलेटिन जारी केले आहे. त्यानुसार, महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या मध्य प्रदेश व गुजरातच्या सीमेवरील काही भागांत पुढील २४ तासांत ‘फ्लॅश फ्लड’ म्हणजेच अचानक पूर येण्याचा मोठा धोका वर्तवण्यात आला आहे.





























































