हिंदुस्थानच्या विजयात पाऊस आडवा

सात वर्षांपूर्वीही क्वीन्स पार्क ओव्हलवरची कसोटी पावसात वाहून गेली होती, तर आज हिंदुस्थानच्या हमखास विजयात पाऊस आडवा आला आहे. कालही पावसामुळे तासाभराचा खेळ वाया गेला होता, तर आज पावसाने जोरदार बॅटिंग केल्यामुळे पहिल्या दोन्ही सत्रात खेळाडू पॅव्हेलियनमध्येच बसून होते. त्यामुळे हिंदुस्थानचे क्लीन स्वीपचे लक्ष्य पावसात वाहून जाण्याची दाट शक्यता आहे. मात्र दोन सामन्यांची मालिका हिंदुस्थान 1-0 ने जिंकेल इतके निश्चित आहे. 

हिंदुस्थानने काल जोरदार फलंदाजी करत वेस्ट इंडीजसमोर 365 धावांचे अवघड आव्हान दिले होते. चौथ्या दिवसअखेर विंडीजची 2 बाद 76 अशी स्थिती होती. त्यामुळे आज हिंदुस्थान पहिल्या दोन सत्रातच सामना संपवेल असा अंदाज होता,पण पावसाने हिंदुस्थानचा अपेक्षाभंग केला आहे. पावसाचा व्यत्यय कायम राहिला तर ही कसोटी अनिर्णितावस्थेत संपेल.