हिंदुस्थान, पाकिस्तानच फायनलमध्ये; एमर्जिंग आशिया चषकाच्या उपांत्य फेरीत कट्टर प्रतिस्पर्ध्यांचे दमदार विजय

कट्टर प्रतिस्पर्धी असलेले हिंदुस्थान आणि पाकिस्तानचेच संघ अपेक्षेप्रमाणे एसीसी एमर्जिंग कपच्या फायनलमध्ये पोहोचले आहेत.  आज झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात हिंदुस्थान संघाने बांगलादेश संघाचा, तर पाकिस्तान संघाने श्रीलंकेच्या संघाचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. आता विजेतेपदासाठी रविवारी हे कट्टर प्रतिस्पर्धी संघ भिडणार असल्यामुळे क्रिकेटप्रेमींना आशिया चषकापूर्वी युवा खेळाडूंच्या आशिया चषकातही क्रिकेटयुद्ध पाहायला मिळणार आहे. 

एसीसी एमर्जिंग चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत हिंदुस्थान आणि  पाकिस्तान यांच्यात चुरशीची लढत होईल, असा अंदाज क्रिकेटतज्ञांकडून व्यक्त करण्यात येत होता. हा अंदाज खरा ठरला आहे. एमर्जिंग आशिया चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात हिंदुस्थान संघाने बांगलादेश संघाचा 51 धावांनी पराभव केला. कर्णधार यश धुलची दमदार फलंदाजी आणि निशांत सिंधूने घेतलेल्या 5 विकेट्समुळे हिंदुस्थानचा विजय सोपा झाला. प्रथम फलंदाजी करताना हिंदुस्थानने 49.1 षटकांत सर्वबाद 211 धावाच धावफलकावर लावता आल्या. कर्णधार यश धुलची 66 धावांची खेळी वगळता हिंदुस्थानच्या इतर फलंदाजांना मोठी खेळी साकारता आली नाही. गेल्या सामन्यातील हीरो साई सुदर्शन या सामन्यात फ्लॉप ठरला. प्रथम फलंदाजी करताना हिंदुस्थानची 7 बाद 137 अशी दयनीय अवस्था झाली होती. हिंदुस्थानी संघ 200 धावांचा टप्पा तरी गाठतो का नाही? अशी परिस्थिती निर्माण झाली होती, मात्र यश धुलने 85 चेंडूंत 6 चौकारांच्या मदतीने 66 धावांची उत्तम खेळी केली. त्याला अभिषेक शर्माने 34 धावा करून उत्तम साथ दिली. इतर फलंदाजांना पंचविशीसुद्धा गाठता आली नाही. बांगलादेशकडून मेहदी हसन 2, तनझीम साकिब 2, रकिबुल हसन 2, रिपोन मोंडोल, सैफ्य हसन आणि सौम्य सरकारला यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. 

212 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशची सकारात्मक सुरुवात झाली. मोहम्मद नईम आणि तांझिद हसन या सलामीच्या जोडीने 70 धावांची भागीदारी केली, मात्र त्यानंतर निशांत सिंधू आणि मानव सुतार यांनी बांगलादेशच्या फलंदाजीला सुरुंग लावला. सिंधूने 8 षटकांत 20 धावा देत 5 विकेट घेतल्या,. तर सुतारने 8.2 षटकांत 32 धावा देत 3 विकेट घेतल्या. तांझिद हसन 51 धावांवर बाद झाल्याने बांगलादेशचा संघ अडचणीत सापडला. निशांत सिंधूने 32 व्या षटकांत सलग दोन विकेट्स घेताना बांगलादेशची अवस्था 8 बाद 154 अशी केली आणि हिंदुस्थानचा विजय निश्चित केला. मानव सुतारने सामन्यातील तिसरी विकेट घेत बांगलादेशचा संपूर्ण संघ 34.2 षटकांत 160 धावांत तंबूत पाठवला. हिंदुस्थानने हा सामना 51 धावांनी जिंकला. 

श्रीलंकेला नमवून पाकिस्तान अंतिम फेरीत 

एमर्जिंग आशिया कप 2023 स्पर्धेमध्ये उपांत्य फेरीच्या सामन्यात पाकिस्तान संघाने श्रीलंकेला नमवून अंतिम फेरीत धडक मारली आहे. पाकिस्तानने श्रीलंकेवर 60 धावांनी विजय मिळविला. स्पर्धेच्या अंतिम फेरीत पाकिस्तानने चार वेळा धडक मारली आहे. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 322 धावांचा डोंगर उभा केला होता. 323 धावांच्या कठीण आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव 262 धावांवरच गडगडला. 

अंतिम सामन्यात हिंदुस्थानचे पारडे जड 

एमर्जिंग आशिया कप स्पर्धेत बुधवारी झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात हिंदुस्थानने 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवला होता. पाकिस्तानने दिलेले 205 धावांचे सोपे आव्हान हिंदुस्थानने दोन विकेटच्या मोबदल्यात 36.4 षटकांत गाठले होते. या सामन्यात 110 चेंडूंत 104 धावांची नाबाद शतकी खेळी करणारा साई सुदर्शन हा हिंदुस्थानच्या विजयाचा हीरो ठरला होता. त्यामुळे येत्या रविवार, 23 जुलैला होणाऱया अंतिम सामन्यात हिंदुस्थानचे पारडे जड राहण्याची शक्यता आहे.