Ind vs WI: हिंदुस्थानचा वेस्ट इंडिजवर एक डाव आणि 141 धावांनी विजय, अश्विनच्या 12 विकेट

हिंदुस्थानने पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा एक डाव आणि 141 धावांनी दणदणीत पराभव केला आहे. या विजयासह हिंदुस्थानने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने पहिल्या डावात 150 धावा केल्या. प्रत्युत्तरात हिंदुस्थानने पहिला डाव 5 बाद 421 धावांवर घोषित केला. पहिल्या डावाच्या आधारे हिंदुस्थानला 271 धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशा केली. दुसऱ्या डावात विंडीजचा संघ अवघ्या 130 धावांवर गारद झाला.

यशस्वी जैस्वालच्या 171 आणि विराट कोहलीच्या 76 धावांच्या जोरावर हिंदुस्थानने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी 5 बाद 421 धावांवर पहिला डाव घोषित केला. यावेळी हिंदुस्थानकडे 271 धावांची आघाडी होती. हिंदुस्थानकडून जैस्वालने 387 चेंडूत 171 धावा केल्या, तर कोहली 182 चेंडूत 76 धावा करून बाद झाला. रवींद्र जडेजा 37 धावा करून नाबाद राहिला.

विंडसर पार्क येथे, हिंदुस्थानने मागच्या धावसंख्येच्या पुढे 2 बाद 312 धावांवर खेळ सुरू केला. डावाच्या 126व्या षटकात हिंदुस्थानला पहिला धक्का यशस्वी जैस्वालच्या रूपाने बसला. कसोटी पदार्पणात शतक झळकावल्यानंतर दुहेरी शतकाकडे वाटचाल करणाऱ्या यशस्वीला अल्झारी जोसेफने बाद केले. तर खेळपट्टीवर सेट होण्यापूर्वीच केमार रोचने अजिंक्य रहाणेला बाद केले. दोन गडी बाद केल्यानंतर वेस्ट इंडिजच्या खेळाडूंचे मनोबल उंचावले होते, पण अनुभवी विराटने लंच ब्रेकपर्यंत रवींद्र जडेजाच्या (नाबाद 37) साथीने धाव केल्या.