
कोरोनाच्या संकटाचे संधीत रूपांतर करत कागल तालुक्यातील शिंदेवाडी गावच्या अजिंक्य अरुण मोरबाळे या साडेपाच वर्षांच्या चिमुरडय़ाच्या पराक्रमाची इंडिया बुक रेकॉर्डने नोंद घेतली आहे.
दैनिक ‘सामना’ने ‘शिंदेवाडीचा चिमुरडा सांगतो, चार मिनिटांत 210 देशांच्या राजधान्या…’ या मथळ्याखाली छापलेल्या बातमीची दखल इंडिया बुक तसेच युनिव्हर्सल ह्युमन राईट कौन्सिल संघटनेने घेतल्याने अजिंक्य ग्लोबल झाला आहे.
अजिंक्यने लॉकडाऊनच्या काळात आई-वडील आणि काकांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या असामान्य प्रतिभेचा आविष्कार दाखवत जगातील 231 देशांपैकी 181 देशांच्या राजधान्यांसह हिंदुस्थानातील 29 राज्यांच्या राजधान्या तोंडपाठ केल्या आहेत. अवघ्या साडेचार मिनिटांत तो अचूकपणे, अस्खलितपणे आणि आत्मविश्वासाने कशाही क्रमाने सांगतो. या आशयाची बातमी प्रसिद्ध झाल्यावर त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मुरगूड आणि परिसरातील अनेक संस्था आणि व्यक्तींनी घरी जाऊन भेटवस्तू देऊन त्याचे कौतुक केले आहे.
दरम्यान, दैनिक ‘सामना’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल घेऊन युनिव्हर्सल ह्युमन राइट कौन्सिलचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष सुहास सावर्डेकर, कार्याध्यक्ष जितेंद्र संकपाळ यांनी अजिंक्यचे अभिनंदन करत कोल्हापूर जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष रणजित बामणे यांना त्याच्या घरी जाऊन सत्कार करण्याचे सुचवले. त्यानुसार बामणे यांनी शिंदेवाडी येथे येऊन त्याचा गौरव केला. तसेच त्याच्या या पराक्रमाची दखल घेऊन त्याच्या उपक्रमाचा व्हिडीओ, पाठांतराचा घटनाक्रम, पाठांतराची यादी मागवून घेतली आहे. जगातील देशांच्या राजधान्या यांचा वेगळा, तर हिंदुस्थानातील राज्यांच्या राजधान्यांचा वेगळा असे दोन स्वतंत्र व्हिडीओ, तसेच देश आणि राज्यांच्या राजधान्यांचा एकत्रित व्हिडीओ संस्थेने मागवला आहे. त्याची पूर्तता आम्ही शुक्रवारी केली आहे. विशेष म्हणजे अवघ्या 3 मिनिटे 53 सेकंदांत हा व्हिडीओ पूर्ण झाल्याची माहिती त्याचे काका कृष्णात मोरबाळे यांनी दिली.
दैनिक ‘सामना’मध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर त्याचा अनेकांनी सत्कार केला. त्याच्या कष्टाचे चीज झाले. खेळण्या-बागडण्याच्या वयात इतरांपेक्षा त्याने काहीतरी वेगळं केल्याचा आम्हाला अभिमान वाटतो, असे त्याची आई अश्विनी या सांगतात.
दैनिक ‘सामना’ने अजिंक्यला राज्यभर पोहोचवले!
मी शेतीसेवा केंद्र चालवतो. लॉकडाऊनच्या संकटात आमच्यासारख्या सामान्य घरातील मुलगा काही वेगळे करू शकतो का, हे पाहण्याचा प्रयोग आम्ही केला. अजिंक्यने त्याला मोठा प्रतिसाद दिला. दैनिक ‘सामना’ने त्याच्या उपक्रमाची दखल घेतली आणि त्याला मोठी प्रसिद्धी मिळाली. युनिव्हर्सल हुमन राईट कौन्सिलने घरी येऊन कौतुक केल्यावर त्याच्या पराक्रमाचे मोल कळाले. ‘सामना’ने त्याला राज्यभर पोहोचवले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद, अशा शब्दांत अरुण मोरबाळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
































































