करंजा-रेवस खाडीपूल १८ महिन्यांत पूर्ण होणार; २ हजार ४७८ कोटी खर्चाचा प्रकल्प, पावसाळ्यातही कामे सुरूच राहणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

करंजा – रेवस खाडीपुलाचे कोकणवासीयांचे स्वप्न आता दृष्टिपथात येऊ लागले आहे. २ हजार ४७८ कोटी खर्चाचा हा प्रकल्प १८ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. प्रकल्पाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी खाडीपुलाचे काम पावसाळा तसेच खवळलेल्या समुद्री लाटांतही अखंडपणे केले जाणार आहे. त्यामुळे नोव्हेंबर २०२७पर्यंत या खाडीपुलाचे काम पूर्ण होईल, असा विश्वास एमएमआरडीएला आहे.

मागील वर्षापासून करंजा – रेवस खाडीपुलाच्या कामाला एमएमआरडीएने सुरुवात केली आहे. त्यामुळे मागील ४६ वर्षांपासून फाईल वरील धूळ झटकत अडगळीत पडलेल्या करंजा – रेवस खाडीपूल आता खऱ्या अर्थाने दृष्टिपथात येऊ लागला आहे. दोन्ही बंदरांना जोडणाऱ्या या पुलामुळे कोकणात पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांना पनवेल, पेण या मार्गाचा वळसा न घालता नवी मुंबईहून करंजा येथून थेट अलिबागला जाता येणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ, इंधन आणि अतिरिक्त पैसे वाचण्यास मदत होईल.

असा आहे प्रकल्प
२ हजार ४७८ कोटी खर्चाच्या या खाडीपुलाचे आतापर्यंत १८ टक्के काम पूर्ण झाले आहे. हळूहळू पुलाच्या कामात येणारे अडथळेही दूर करण्यात येत आहेत. बाधितांना देण्यात येणारी मोबदल्याची रक्कमही संबंधित विभागाकडे जमा करण्यात आली आहे. या कामातील २ ते ३ किमी क्षेत्रातील कांदळवन, पर्यावरण, सीआरझेड आदी अनेक आवश्यक प्रलंबित परवानग्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे. पुलाचे काम पावसाळ्यातही आणि खवळलेल्या समुद्राच्या लाटांचा सामना करत अखंडितपणे सुरूच राहणार आहे. यामुळे नोव्हेंबर २०२७ पर्यंत असलेल्या मुदतीत या महत्त्वाच्या खाडीपुलाचे काम पूर्ण होईल अशी माहिती एमएमआरडीएचे उपअभियंता अनिरुद्ध बोराडे यांनी दिली.

४६ वर्षापूर्वीचे स्वप्न
रायगडच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांनी १९८० – साली करंजा-रेवस खाडीपूल उभारण्याच्या कामाला मंजुरी दिली होती. २.४ किमी लांबीच्या रेवस-करंजा खाडीपुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी ३०० कोटी रुपये खर्चाची तरतूदही करण्यात आली होती. मात्र कामाच्या विलंबामुळे प्रकल्पाचा खर्च आता २ हजार ४७८ कोटींपर्यंत पोहोचला आहे.

  • रेवस-करंजा ही दोन्ही बंदरे खाडीपुलाच्या रस्त्याला जोडली जाणार.
  • नवी मुंबई – अलिबागदरम्यान २० किमी अंतर कमी होणार.
  • वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवास जलद होणार.