
छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू आणि तडफदार सेनानी कोयाजी बांदल. अफजलखानाच्या मोहिमेपासून ते पन्हाळ्याचे स्वातंत्र्य मिळवण्यात तसेच लाल महालामधील हल्ला, रोहिडा आणि पावनखिंडीमधील लढाई यात कोयाजी बांदल यांचा महाराजांसोबत महत्त्वपूर्ण सहभाग होता. पुण्यातील लाल महालात कुंडली मारून बसलेल्या शाहिस्तेखानावर हल्ला करण्याचा बेत छत्रपती शिवाजी महाराजांनी आखला. या मोहिमेत सहभागी काही प्रमुख सरदारांपैकी एक कोयाजी बांदल होते. या शूरवीरांनी शाहिस्तेखानाची तीन बोटे तोडून त्याचे सैन्य पुण्यातून पळवून लावले. मोहिमेत सहा मावळे ठार झाले. कोयाजी बांदल यावेळी खूप जखमी झाले व काही दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या या शौर्याबद्दल महाराजांनी त्यांना मौजे आलंदे ऊर्फ हिरडस मावळ येथे जमीन इनाम देऊन कोयाजींचा गौरव केला. त्यांची समाधी भोरच्या भाटघर धरणाच्या नेकलास पॉईंट परिसरातील टेकडीच्या मध्यावर आहे. थोडय़ाशा उंच टेकडीवर निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या समाधीचे संवर्धन होणे गरजेचे आहे. कारण समाधी परिसरात चौथरासदृश अवशेष विखुरलेले दिसतात.



























































