पूनम महाजन यांचा पत्ता कट; उत्तर-मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांना भाजपची उमेदवारी

उत्तर-मध्य मुंबईतील भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा अखेर पत्ता कापला आहे. या मतदारसंघातून भाजपने सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम यांच्या गळय़ात उमेदवारीची माळ टाकली आहे. भाजपने गोपाळ शेट्टी आणि मनोज कोटक यांचे यापूर्वी तिकीट कापले आहे आणि आता पूनम महाजन यांचे तिकीट कापून ‘महाजन’ नाव पुसल्याची चर्चा आहे. तिकीट कापलेले तीन खासदार भाजपच्या प्रचारापासून लांब राहाण्याची चिन्हे आहेत.

उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार, आमदार अमित साटम यांच्या नावाची चर्चा होती, मात्र भाजपने उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघात धक्कातंत्राचा वापर करत ऍड. उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड आणि उज्ज्वल निकम यांच्यात लढत होईल.

 महाजन यांचे नाव पुसण्याचा प्रयत्न

भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत प्रमोद महाजन यांच्या राजकीय वारसदार म्हणून पूनम महाजन राजकारणात सक्रिय झाल्या होत्या. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी यांच्यानंतर प्रमोद महाजन यांचे नाव घेतले जात होते. महाराष्ट्र भाजपच्या राजकारणात महाजन यांचा शब्द अंतिम मानला जात होता. त्यामुळे प्रमोद महाजन यांच्या हत्येनंतर भाजपने पूनम महाजन यांना  राजकारणात संधी दिली. पूनम  यांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली. 2009 मध्ये घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघातून त्यांना पराभव पत्करावा लागला. मात्र  2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्या उत्तर-मध्य मुंबईतून निवडून गेल्या होत्या. आताही महाजन यांना उमेदवारीची अपेक्षा होती, मात्र भाजपने मुंबईतील विद्यमान दोन खासदारांना जो निकष लावला तोच निकष पूनम यांना लावल्याने ‘महाजन’ यांचे नाव पुसण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा आहे

 

सचिन सावंत यांचा भाजपवर निशाणा

या मुद्दय़ावरून काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी एक्सच्या माध्यमातून भाजपवर निशाणा साधला आहे. ‘भाजपने पूनम महाजन यांचे तिकीट कापल्यामुळे आता मुंबईतील तीनही विद्यमान खासदारांना तिकीट दिलेले नाही. याचा सरळसरळ अर्थ तीनही मतदारसंघात भाजपतर्फे काम शून्य झाले तेथील जनता नाराज आहे तसेच भाजपचे प्रतिनिधी कामचुकार अतात असे भाजपचेच म्हणणे आहे. बाकी पूनमताई, गोपाळ शेट्टी आणि मनोज कोटक यांच्याबद्दल सहानभूती आहे,’ असा टोला या पोस्टच्या माध्यमातून मारला आहे.