पावसाळ्यात पाय दुखण्याचे प्रमाण वाढले, खड्डे, चुकीच्या पादत्राणांमुळे पायदुखी आणखी वाढली

यंदाच्या पावसाळ्यात पाय आणि घोट्यासंबंधीत वेदनेच्या घटनांमध्ये 40%-50% वाढ झाल्याची नोंद डॉक्टरांनी केली आहे. घोट्याला दुखापत होण्यास कारणीभूत घटकांपैकी निसरडा पृष्ठभाग, खड्डे, खराब रस्ते आणि चुकीच्या पादत्राणांचा वापर यांचा समावेश आहे. पावसाळ्यात खड्डे पाय गेल्याने तो मुरगळण्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. रूग्णालयातील बाह्यरूग्ण विभागात पायाच्या घोट्याला दुखापत आणि फ्रॅक्चर झालेले दररोज 6 ते 7 रूग्ण उपचारासाठी येत असल्याचं डॉक्टर सांगत आहेत. या दुखापतीकडे वेळीच लक्ष न दिल्यास दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात.

उतारवयात पाय घसरून पडल्याने हात-पाय फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते. यामुळे पायातील घोटा, लिगामेंट्स आणि स्नायूंवर येणारा अतिरिक्त ताण येऊ शकतो. परंतु, पावसाळ्यात अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक आहे. कारण पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे पडतात. अशा वेळी रस्त्यावरून चालताना पाय घसरल्याने किंवा पायाचे हाड फ्रॅक्चर होण्याची शक्यता अधिक असते. पावसाळ्यात पाय किंवा घोट्याला दुखापत होऊ शकते असे अपोलो स्पेक्ट्रा मुंबईचे फुट ॲण्ड अँकल सर्जन डॉ. ध्रुमीन संगोई यांनी म्हटले आहे.

पाय घसरल्याने किंवा पडल्याने घोट्याला दुखापत झाल्याचे २ ते ३ रूग्ण उपचारासाठी येतात. परंतु, सध्या पावसाळ्यात पायाला फ्रॅक्चर झालेले दरदिवशी ६-७ रूग्ण रूग्णालयातील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचारासाठी येत आहेत. घोट्याच्या दुखापती,सौम्य अस्थिबंधनाला झालेली दुखापक, अस्थिबंधन फाटणे किंवा फ्रॅक्चर अशा तक्रारी पहायला मिळतात. फ्रॅक्चरच्या उपचारांसाठी प्लास्टर कास्ट आवश्यक आहे. या कालावधीत दुखापत झालेल्या घोट्यावर वजन येऊ नये म्हणून वजन उचलण्यास मनाई केली जाते. इतर काही गंभीर प्रकरणांमध्ये प्लेट्स आणि स्क्रूसह फ्रॅक्चर निश्चित करणे आवश्यक असू शकते. अशा परिस्थितीत, रुग्णाला पूर्णपणे बरे होण्यासाठी अधिक कालावधी लागतो असे झायनोव्हा शाल्बी रूग्णालयातील ऑर्थोपेडिक अण्ड नी रिप्लेसमेंट सर्जन डॉ. धनजंय परब यांनी सांगितले आहे.

निसरड्या पृष्ठभागावर चालताना विशेष काळजी घ्या, चांगल्या पादत्राणांचा वापर करा. उंच टाच आणि पृष्ठभाग गुळगुळीत असलेली चप्पल वापरणे टाळा. ओल्या किंवा असमान पृष्ठभागावर चालताना सावधगिरी बाळगा. डबके, चिखल आणि इतर अडथळ्यांकडे लक्ष द्या ज्यामुळे तुम्ही घसरू शकता किंवा तोल गमावू शकता असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.