दुष्काळाच्या संकटात लोडशेडिंगच्या वेदनांची भर, मंत्रालयात बसून सौर ऊर्जेची धोरणे ठरवू नका; बळीराजाच्या मनातील खदखद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> राजेश चुरी

मराठवाडय़ाच्या दुष्काळात आता लोडशेडिंगच्या संकटाची भर पडली आहे. वीज गेल्यावर कांद्यासारख्या पिकांचा बोअरवेलचा पाणीपुरवठा बंद पडतो. सरकार म्हणते सौर ऊर्जेवर बोअरवेल चालवा, पण मंत्रालयातून बोअरवेलच्या सौर ऊर्जेची धोरणे ठरवू नका. दोनशे फुटांपर्यंतच्याच बोअरवेल सौर ऊर्जेवर चालतात. खोलवरच्या बोअरवेल सौर ऊर्जेवर चालत नाहीत, अशी व्यथा शेतकऱ्यांनी मांडली.

धाराशीवमध्ये शेती करपून गेल्यामुळे शेतकऱ्यांनी बोअरवेलच्या पाण्यावर कांद्याचे पीक घेण्यास सुरुवात केली आहे. एका गावात बोअरवेलचे पाणी कांद्याच्या पिकाला दिले जात होते. अचानक बोअरवेलचा पाण्याचा पुरवठा बंद पडला. बाजूलाच असलेल्या शेतमजुरांनी नाराजी व्यक्त करत ‘आता झाले लोडशेडिंग सुरू’ असे सांगत कपाळावर हात मारला.

दिवसभर वीज गायब

गेल्या आठ दिवसांत लाईटची परिस्थिती जरा बरी होती, पण हल्ली इमर्जन्सी लोडशेडिंगचा नवा प्रकार सुरू झाला आहे. एखाद् दिवशी पूर्ण झीरो सबस्टेशन करतात. कुठे लोड जाते आणि कुठे वीज जाते याचा काही पत्ताच नाही. इमर्जन्सी लोडशेडिंग आल्यावर लाईट कधी येईल ते सांगता येत नाही. फक्त मेसेज येतो. इमर्जन्सी म्हणजे येथील वीज हिंगोली, नांदेड, परभणीकडे वळवली जाते. त्या ठिकाणी लाईट कमी पडली तर इथला वीजपुरवठा पूर्णपणे बंद करतात. कधी बारा तर कधी पंधरा तास वीज नसते. दिवसभर वीज गायब असल्याचे त्यांनी सांगितले.

सहाशे फुटांवर बोअरवेलला पाणी

शेतकऱ्याला सौर ऊर्जा घेऊ द्या सांगतात, पण सौर ऊर्जेवर बोअरवेल चालत नाही. तिथे मंत्रालयात बसून काहीही बोलता येते. इथे बोअरवेलला पाचशे-सहाशे फूट खोलीवरही पाणी लागत नाही. फक्त वरच्या पातळीवर पाणी असेल तरी सौर ऊर्जेवर पंप चालतो. इमर्जन्सीमध्ये बोअरवेल सौर ऊर्जेवर चालत नाही. दोनशे फुटांच्या वर पाणी असेल तर बोअरवेल सौर ऊर्जेवर चालते याकडे त्यांनी लक्ष वेधले.

कांदा आयात केला तर शेतकरी संपेल

शेतीला पाणी नाही आणि आता बोअरवेलच्या पाण्यावर कांदा लागवड सुरू केली तर याच्यासाठीही पाणी नाही. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या काळात बाजारात कांदा मिळत होता, पण आता कांदा कुठे येतोय? पुढील वर्षी कांद्याची फार अडचण येणार. सरकारने कांदा आयात करू नये. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना चार पैसे मिळावेत. कांदा आयात केला तर सर्वच संपेल अशी, भीती त्यांनी व्यक्त केली.