खोके सरकारचा रडीचा डाव; साताऱ्यातील पराभवाच्या भीतीने शशिकांत शिंदेंवर गुन्हा दाखल

सातारा लोकसभा मतदारसंघातील पराभवाच्या भीतीने खोके सरकारने आता रडीचा डाव खेळण्यास सुरुवात केली आहे. एपीएमसीतील कथिम एफएसआय घोटाळा उकरून काढून साताऱयातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह 24 संचालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. यापूर्वीही पोलिसांनी कथित शौचालय घोटाळाप्रकरणी एपीएमसीच्या फळ मार्केटचे संचालक संजय पानसरे यांना अटक केली आहे. या सूडाच्या राजकारणामुळे एपीएमसीतील माथाडी कामगार आणि व्यापाऱयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

शशिकांत शिंदे यांना महाविकास आघाडीच्या माध्यमातून सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाल्यानंतर भाजपवाले आणि मिंधे गटाच्या पायाखालील वाळू सरकली आहे. शिंदे यांना अडचणीत आणण्यासाठी जुन्या कथित घोटाळ्यांची भुते आता बाहेर काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे. शौचालय घोटाळ्यापाठोपाठ आता एफएसआय घोटाळाप्रकरणी शशिकांत शिंदे यांच्यासह 24 संचालक आणि तत्कालीन सचिव सुधीर तुंगार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एपीएमसीमधील व्यापारी आणि माथाडी कामगार यांचा कौल सातारा आणि शिरूर मतदारसंघासाठी महत्त्वाचा मानला जातो. साताऱयामध्ये शशिकांत शिंदे यांना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एपीएमसीमध्ये व्यापारी आणि माथाडी कामगारांनी त्यांचे मोठय़ा जल्लोषात स्वागत केले होते. त्यामुळे शिंदे यांना घेरण्यासाठी खोके सरकारने जिवाचा आटापिटा सुरू केला आहे.