दापोलीत अजित पवार गटाला धक्क्यांवर धक्के; फरारे गावाचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

रायगड लोकसभा मतदार संघाच्या मतदानाला आठवडा उरला आहे. असे असतानाच दापोलीत मोठया राजकिय घडामोडी घडू लागल्या आहेत. माजी आमदार संजय कदम यांच्या सक्षम नेर्तृत्वाखाली दापोलीत शिवसेना पक्ष प्रवेश जोरदार सुरू आहे. त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांना हे अपयश पचवणे कठीण जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

दापोलीत विविध राजकिय पक्षांचे कार्यकर्ते हे संजय कदम यांच्या नेर्तृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवसेनेत मोठया संख्येने प्रवेश करत आहेत. काही दिवसांपुर्वी पालगड जिल्हा परिषद गटातील शिरखल दगडवणे वाडी येथील मिंधे गटातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला होता. त्यानंतर अजित पवार गटाचे बुरोंडी विभाग अध्यक्ष नवरंग बागकर आणि देवेंद्र बैकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पक्षप्रवेशाचा सिलसिला सुरु असतानाच आता सोमवारी (29 एप्रिल 2024) असोंड जिल्हा परिषद गटातील राजकियदृष्टया अतिशय संवेदनशिल असलेल्या संपूर्ण फरारे गावातील मोहल्ल्यासह मोगरेवाडीतील सुमारे 800 लोकांनी संजय कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी उप जिल्हा प्रमुख विजय जाधव, विधानसभा संपर्क प्रमुख सचिन पाटील आदी उपस्थित होते. हा पक्ष प्रवेश जिल्हयातील आतापर्यंतचा सर्वात मोठा पक्ष प्रवेश मानला जात आहे. त्यामुळे मिंधे गटासह अजित पवार गटाचे धाबे दणाणले आहेत. शिवसेनेत होत असलेल्या पक्ष प्रवेशांमुळे या भागाचे आमदार म्हणून नेतृत्व केलेल्या रामदास कमद आणि त्यांचे पुत्र आमदार योगेश कदम यांना लोक नाकारत असल्याचे उघड झाले आहे.

दापोली विधानसभा मतदार संघात माजी आमदार संजय कदम यांनी एकाकीपणे लढत देत शिवसेनेचे चांगले संघटन निर्माण केले आहे. त्यांचे नेर्तृत्व स्वीकारत दिवसेगणिक साततत्याने शिवसेनेत होणारे पक्ष प्रवेश येथील राजकिय समिकरणे बदलत आहेत. रायगड लोकसभा मतदार संघात अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष सुनिल तटकरे हे स्वतः निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अनंत गिते उभे ठाकले आहेत. अनंत गितेंच्या विरोधात सुनिल तटकरे, रामदास कदम, योगेश कदम, माजी आम. सुर्यकांत दळवी यांनी निवडणूक प्रचार सभांचा धडाका लावला आहे. असे असले तरी तटकरे आणि त्यांच्या महायुतीतील सहकाऱ्यांनी घेतलेल्या सभांच्या सोपस्काराचे मनसुभे माजी आम.संजय कदम हे शिवसेनेतील होणाऱ्या पक्ष प्रवेशाने पुरते फोल ठरवत आहेत.