महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आंब्याला मिळाला उच्चांकी दर; विद्यापीठाला मिळाले 1 कोटी 63 लाखाचे उत्पादन

राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील आंब्याला यंदा विक्रमी बाजारभाव मिळाला असून, या पिकातून विद्यापीठाला 1 कोटी 63 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले आहे. कृषी विद्यापीठाच्या खडकाळ प्रक्षेत्रावर विविध प्रकारच्या आंब्याची 6500 झाडे आहेत. केशर, वनराज, तोतापुरी, लंगडा, हापूस या आंब्यांपैकी केशर आंब्याला संपूर्ण महाराष्ट्रभर मागणी असते.

सालाबादप्रमाणे आंब्याचा सिझन सुरू झाल्याने राहुरी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावरील आंबा विक्री ई-टेंडर पद्धतीने करण्यात आली. आंबाविक्रीतून कृषी विद्यापीठाच्या तिजोरीत 1 कोटी 63 लाखांहून अधिकची रक्कम जमा झाली आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या खडकाळ प्रक्षेत्रावर केशर, तोतापुरी, लंगडा, हापूस, वनराज अशा वेगवेगळ्या नावाने ओळख असलेली आंब्याची झाडे आहेत.

कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा आंबा उत्पादनात वाढ झाली असून, विक्री पद्धतीमध्ये केलेल्या बदलांमुळे कृषी विद्यापीठास यंदा अधिकचा महसूल प्राप्त झाला आहे. आंबा उत्पादनवाढीसाठी प्रक्षेत्रावरील अधिकारी व कर्मचाऱयांनी आंबा बागांचे खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन तसेच किडींचे केलेल्या योग्य व्यवस्थापनाबाबत विशेष काळजी घेण्यात आली. यापूर्वी सन 2022 मध्ये आंबा विक्रीतून कृषी विद्यापीठास 1 कोटी 25 लाख रुपयांचा महसूल मिळाला होता. यावर्षी मध्यवर्ती रोपवाटिका विभाग तसेच ‘अ’ व ‘ब’ विभागातील प्रक्षेत्रावर नव्याने 3700 आंबा रोपांची लागवड केलेली आहे. आगामी काळात कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर आंबा लागवडीखालील नवीन क्षेत्रात वाढ करण्यात येणार आहे. जेणेकरून विद्यापीठास कायमस्वरूपी महसूल प्राप्त होईल.

आंबा फळपिकासाठी कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, कुलसचिव अरुण आनंदकर, नियंत्रक सदाशिव पाटील, अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे, बियाणे विभागाचे प्रमुख शास्त्र्ाज्ञ डॉ. आनंद सोळंके तसेच उद्यानविद्या विभागप्रमुख डॉ. बी. टी. पाटील यांचे सहकार्य लाभत आहे.