जरांगे यांचे 5 जूनपासून पुन्हा उपोषण; आरक्षण दिले नाही तर मराठा समाज विधानसभेची तयारी करणार

महायुती सरकारने मराठा समाजाला फसवण्याचे काम केले असल्याचा आरोप करतानाच, 5 जूनपर्यंत ओबीसीतून आरक्षण नाही दिले नाही तर मराठा समाज विधानसभेची तयारी करणार तसेच 5 जूनपासून आपण पुन्हा उपोषणाला सुरुवात करणार, अशी घोषणा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आज केली. महायुती सरकारने मराठा समाजाला फसवण्याचे काम केले, असे आरोप पुन्हा एकदा जरांगे यांनी केले आहेत.

मनोज जरांगे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाने कुठेही उमेदवार दिलेला नाही किंवा कुणाला पाठिंबाही दिलेला नाही, असे स्पष्ट केले.

महायुती सरकारने फसवले
आज देऊ, उद्या देऊ असे म्हणत आरक्षणाचे आश्वासन देऊन सात महिने झाले, परंतु अद्याप ओबीसींमधून मराठय़ांना आरक्षण देण्यावर निर्णय झालेला नाही. महायुती सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली, असा आरोप जरांगे यांनी केला.

फडणवीसांचे मराठा समाजावर अतिप्रेम
सात महिन्यांआधीच्या घटनांचे गुन्हे दाखल करणे सुरू आहे, मराठय़ांविषयी देवेंद्र फडणवीस यांना अतिप्रेम आहे. मराठय़ांवर गोळय़ा झाडणाऱया पोलीस अधिकाऱयाला त्यांनी बढती दिली. शाबासकी देण्यासारखीच ही कामगिरी आहे, असा टोला जरांगे यांनी लगावला.

अशोक चव्हाणांचा इकडून तिकडे जाण्याचा धंदा
अशोक चव्हाण यांचा इकडून तिकडे जाण्याचा धंदा आहे. सत्तेत असल्यावर ते आरक्षण देत नाहीत. सत्तेत नसतील तेव्हा आंदोलनाच्या बाजूने बोलतात. आता सध्या त्यांचे सरकार आहे. तरीही नांदेडमध्ये महिलांवर गुन्हे दाखल होत आहेत,’ असे जरांगे म्हणाले.