सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपींविरोधात मोक्का; चौघांना अटक, गँगस्टर बिष्णोई भाऊ वॉण्टेड

अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील घरावर बेछूट गोळीबार केल्या प्रकरणातील आरोपींविरोधात मुंबई पोलिसांनी कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिसांनी आरोपींवर मोक्का लावला आहे. गोळीबार प्रकरणात गुन्हे शाखेने चार जणांना अटक केली असून गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई आणि त्याचा भाऊ तसेच या गुह्याचा मास्टरमाइंड अनमोल बिष्णोई हे दोघे वॉण्टेड आरोपी आहेत.

14 एप्रिलच्या पहाटे सलमान खानच्या घरावर गोळीबार झाला होता.  सागर पाल आणि विकी गुप्ता या दोघा बिहारच्या तरुणांनी हे कांड केले होते. पंजाबमध्ये गोळीबार करण्याचा कट शिजल्यानंतर सागर आणि विक्की हे आरोपी 28 फेब्रुवारीला मुंबईत आले होते. त्यांनी 10 मार्च रोजी पनवेलमध्ये एक घर भाडय़ाने घेतले. काही दिवस तेथे राहिल्यानंतर ते होळीनिमित्त गावी गेले. गावावरून परतल्यानंतर त्यांनी प्रत्यक्षात गुन्हा केला होता. या गोळीबार प्रकरणात गुन्हे शाखेने सागर, विक्की यांना पकडल्यानंतर या दोघांना पिस्तूल आणून देणारे व कटात सहभागी असलेले सोनू बिष्णोई आणि अनुजकुमार थापन या दोघांची नावे पुढे आली. त्यानुसार पोलिसांनी दोघांना पंजाबमधून पकडून आणले. चार जणांना बेडय़ा ठोकल्यानंतर पोलिसांनी आरोपींविरोधात ‘मोक्का’न्वये कारवाई केली. पोलीस आता या गुह्याचा मास्टरमाइंड गँगस्टर अनमोल बिष्णोई याचा शोध घेत आहेत. अनमोलविरोधात लूक आऊट नोटीसदेखील जारी केली आहे.

थापनविरोधात दोन गुन्हे; सात पिस्तुले हस्तगत केली होती

दरम्यान, हा गोळीबार करण्यासाठी या दोघांना पिस्तूल आणून देणारे सोनू बिष्णोई आणि अनुजकुमार थापन या दोघांना गुन्हे शाखेने पंजाबमधून पकडून आणले. दोघांपैकी थापनविरोधात पंजाबमध्ये दोन गुह्यांची नोंद आहे. त्यात एक गोळीबार केल्याचा गुन्हा आहे. तर पंजाबच्या गंगानगर पोलिसांनी थापनकडून सात पिस्तुले हस्तगत केली होती, असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येते.

होळीकरिता गावी जाऊन गोळीबाराचा सराव

पनवेल येथे भाडय़ाने घेतलेल्या खोलीत काही दिवस राहून सागर आणि विक्की होळीकरिता पुन्हा गावी गेले होते. त्यावेळी दोघांनी गावी गोळीबार करण्याचा सराव केला होता. त्यासाठी दोघांनी प्रत्येकी चार अशा प्रकारे आठ गोळय़ांचा वापर केला. तेथून परतल्यानंतर त्यांनी सलमानच्या घरावर गोळीबार केला असे पोलीस सूत्रांकडून समजते.  हा गोळीबार करण्यासाठी त्यांना सोनू आणि अनुज यांनी पिस्तूल आणि काडतुसे आणून दिली होती.