भंडारदरा आणि आंबोलीत वर्षा महोत्सवाचे आयोजन

पाऊस म्हणजे उत्सव, पाऊस म्हणजे धमाल. पावसाचा हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी पर्यटन संचालनालयाने येत्या 12 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट 2023 दरम्यान वर्षा महोत्सवाचे आयोजन केले आहे.  पर्यटन संचालनालयाचे संचालक  डॉ.बी.एन.पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे. 12 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट दरम्यान होणार्‍या या वर्षा महोत्सवाच्यानिमित्ताने महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा, लोककला, स्थानिक खाद्यपदार्थ अशा अनेक गोष्टी पर्यटकांना अनुभवायला मिळतील. हा महोत्सव भंडारदरा व आंबोली पर्यटनाला चालना देणारा ठरेल. हे पाच दिवस पर्यटकांसाठी मंतरलेले ठरतील असा विश्वास,  पाटील यांनी व्यक्त केला आहे. या महोत्सवामुळे यामुळे स्थानिक पर्यटन वाढीसाठीही मोठी मदत होईल असे त्यांनी म्हटले आहे.

या वर्षा महोत्सवासाठी येणाऱ्या पर्यटकांना भंडारदरा येथे आल्यास येथील पर्यटन स्थळे आणि काजव्यांच्या लखलखाटाची झळक दाखवणारी चित्रपफीत दाखवण्यात येईल.याशिवाय पर्यटकांना घाटघर येथील स्थानिक आदिवासी बांधवांचे पारंपारिक होळी नृत्य, उडदावणे येथील आदिवासी बांधवांचे कांबड नृत्य, फुगडी आणि टिपरी नृत्य पाहायला मिळेल. या महोत्सवात तरुणांसाठी डीजे आणि पावसाळी गाण्यांसह रेन डान्सचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. वारली चित्रकला कार्यशाळा आयोजित केली जाणार असून तीन उत्कृष्ट चित्रांना पारितोषिक आणि सन्मानपत्र दिले जाईल. कपल डान्स, कपल ऍक्टिव्हिटी, संगीत खुर्ची यासारखे कार्यक्रमही यानिमित्ताने आयोजित केले जाणार आहे. मान्सून झुंबा हा या महोत्सवाचे महत्त्वाचे आकर्षण असेल.