मुंबई-नाशिक महामार्गावर होणार चक्काजाम, दुरुस्तीसाठी एक मार्गिका आजपासून बंद

मुंबई- नाशिक महामार्गावरील साकेत पुलाचे जॉइंट बेअरिंग तुटले आहे. त्यामुळे वाहतूककोंडी पुन्हा होण्याची दाट भीती असून या ‘चक्काजाम’ मुळे प्रवाशांची व वाहतूक चालकांची तासन्तास रखडपट्टी होणार आहे. दुरुस्तीसाठी एक मार्ग बंद ठेवावा लागणार आहे. या कामासाठी ७ ते ८ दिवसांचा कालावधी लागणार असल्याने आठवडाभर चक्काजामचा त्रास सहन करावा लागणार आहे.

ठाण्यालगत असलेल्या मुंबई- नाशिक महामार्गावर वाहतूककोंडीचा नेहमीच फटका बसत असतो. ठाणे-भिवंडी बायपासवर आता पुन्हा एकदा वाहतूककोंडी होण्याची शक्यता आहे. साकेत पुलाचे तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. हा उड्डाणपूल हलतो आहे, असे निदर्शनास आल्यानंतर तत्काळ प्रशासनाने युद्धपातळीवर हालचाली करून याची पाहणी केली. पुलाच्या पाहणीनंतर एक्सपानशन जॉइंट मधील बेअरिंग निखळून खाली पडल्याचे निदर्शनास आले आहे

हा पूल कॅण्टिलिव्हर पद्धतीचा असून जोडण्यात येत असेलल्या ठिकाणीं तो हलतोच. मात्र जॉइंटमधली बेअरिंग तुटल्याने जास्त हलतो आहे, अशी माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली. ही बाब लक्षात येताच तातडीने याचे काम सुरू करण्यात आले आहे.

रामदास आठवले यांनी केली पाहणी

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे याच उड्डाणपुलावरून जात असताना थांबले. आठवले यांनीदेखील या उड्डाणपुलाची पाहणी केली. हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी अतिशय धोकादायक असल्याचे सांगत दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पुलाची तत्काळ दुरुस्ती करणे आवश्यक आहे. संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून तशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे आठवले यांनी यावेळी सांगितले.

या मार्गिकेचे काम हाती घेतले जाणार असल्याने वाहतूक अधिकाऱ्यांशी बोलून तशा वळवली जाणार आहे. दोन्ही मार्गिकेवरील वाहतुकीचा ताण ओळखून प्राधान्यक्रमाने वाहने सोडली जातील. त्यामुळे कोंडी न होता वाहतूक सुरळीत ठेवली जाण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.